आरोपी नातेवाईक असल्याने बदनामीच्या भीतीने घरच्यांनी पोलिसांत न जाण्याचा सल्ला दिला. पण, पीडित मुलाच्या आईने कोणाचेही न ऐकता थेट वलियथुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

तिरुवनंतपुरम: एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या ४३ वर्षीय आरोपीला न्यायालयाने तब्बल ४७ वर्षांची सक्तमजुरी सुनावली आहे. कोंबड्यांना दाणापाणी टाकण्याच्या बहाण्याने त्याने मुलाला बोलावून घेतले आणि त्याच्यावर अत्याचार केले. दास अँटनी असे या नराधमाचे नाव आहे. तिरुवनंतपुरमच्या जलदगती विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश अंजू मीरा बिर्ला यांनी त्याला ४७ वर्षांची सक्तमजुरी आणि ३२,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास त्याला आणखी ३ वर्षे ३ महिने अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल. ही धक्कादायक घटना २४ मे २०२५ रोजी घडली होती. घटनेच्या दिवशी दुपारी आरोपीने मुलाला आपल्या घरच्या कोंबड्यांसाठी तांदूळ घेऊन बोलावले होते. मुलगा तांदूळ घेऊन आल्यावर आरोपीने त्याला घरात नेले आणि त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. त्यावेळी घरात दुसरे कोणीही नव्हते.

आरोपी मुलावर अत्याचार करत असतानाच अचानक घरी कोणीतरी आले. तेव्हा त्याने मुलाला एका खोलीत कोंडून ठेवले आणि तो बाहेर गेला. यादरम्यान मुलाचे आजोबा त्याला शोधत तिथे आले, पण 'मुलगा मघाशीच निघून गेला' अशी थाप मारून आरोपीने त्यांना परत पाठवले. आजोबा गेल्यानंतर त्याने पुन्हा मुलावर अत्याचार केले. या भयंकर प्रकाराने घाबरलेल्या मुलाने सुरुवातीला कोणालाच काही सांगितले नाही. काही दिवसांनी घरच्यांनी त्याला पुन्हा आरोपीच्या घरी काही सामान देण्यासाठी जायला सांगितले, तेव्हा त्याने जाण्यास स्पष्ट नकार दिला. घरच्यांनी ओरडल्यावर अखेर त्याने आपल्या बहिणीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. आरोपी जवळचा नातेवाईक असल्याने बदनामी होईल, म्हणून पोलिसांत तक्रार करू नका, असा दबाव नातेवाईकांनी टाकला. पण मुलाच्या आईने कोणाचेही न ऐकता थेट वलियथुरा पोलिसांत धाव घेतली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. आर. एस. विजय मोहन आणि ॲड. सुरभी पी. यांनी काम पाहिले. वलियथुरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश आर. आणि अरुण एस. यांनी या प्रकरणाचा तपास केला. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने १६ साक्षीदार तपासले, तसेच १६ कागदपत्रे आणि ३ महत्त्वाचे पुरावे न्यायालयात सादर केले.