पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाल सिग्नलला गाडी थांबवली म्हणून एका दुचाकीस्वाराला बेदम मारहाण करण्यात आली. मागून आलेल्या कारने आधी धडक दिली आणि नंतर कारमधील दोघांनी खाली उतरून त्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.
पुण्यात घडलेल्या एका घटनेने सध्या सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. लाल सिग्नलला गाडी थांबवली म्हणून एका दुचाकीस्वाराला मारहाण करण्यात आली. जहांगीर हॉस्पिटल चौकात हा प्रकार घडला. यामुळे रस्त्यावरील सुरक्षा आणि ट्रॅफिक नियमांच्या उल्लंघनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
एक्स (X) वरील एका पोस्टनुसार, दुपारी ३ वाजून ८ मिनिटांनी ही घटना घडली. एक तरुण ज्युपिटर स्कूटरवरून जात होता. सिग्नल लाल झाल्याने त्याने आपली गाडी थांबवली. तेवढ्यात मागून आलेल्या एका चारचाकी गाडीने त्याच्या स्कूटरला धडक दिली.
धडक दिल्यावर चूक मान्य करण्याऐवजी कारमधून दोन जण खाली उतरले. त्यांनी थेट या स्कूटरस्वाराला मारहाण करायला सुरुवात केली. 'तू सिग्नलला गाडी का थांबवलीस?' असा जाब विचारत त्यांनी त्याला मारलं.
या घटनेवर इंटरनेटवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. जे लोक प्रामाणिकपणे ट्रॅफिक नियम पाळतात, त्यांनाच असा त्रास सहन करावा लागत असेल तर कसं होणार, अशी चिंता युजर्स व्यक्त करत आहेत. ट्रॅफिक पोलिसांची भूमिका आणि अशा गुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
या मारहाणीच्या घटनेवर एका एक्स युजरने सडेतोड प्रतिक्रिया दिली. भारताची जागतिक पातळीवर मोठी स्वप्नं आणि सामान्य माणसाला नियम पाळताना येणाऱ्या अडचणी यावर त्याने बोट ठेवलं. "एक माणूस लाल सिग्नलला थांबतो, मागून एक गाडी त्याला धडक देते आणि सिग्नलला थांबला म्हणून त्यालाच मारहाण केली जाते. दुसरीकडे आपले नेते भारताला विश्वगुरू बनवण्याचं स्वप्न पाहत आहेत. कदाचित आपण आधी अशा टप्प्यावर पोहोचलं पाहिजे जिथे साधे ट्रॅफिक नियम पाळण्यासाठी धाडसाची गरज भासणार नाही," असं या युजरने लिहिलं.
इतर अनेक युजर्सनी या घटनेसाठी लोकांची मुजोरी आणि बेजबाबदारपणाला जबाबदार धरलं आहे. एका युजरने या तरुणांच्या अरेरावीवर टीका करत प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
"प्रत्येक सिग्नलवर रोज हेच चित्र असतं. जोपर्यंत नियम मोडणाऱ्यांवर वेळेवर कारवाई होत नाही, तोपर्यंत हे थांबणार नाही. फक्त चलन कापून काहीही फरक पडत नाही," अशी कमेंट दुसऱ्या एका युजरने केली.
