ग्रेटर नोएडातील पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) शाखेतून ग्राहकांच्या खात्यातील तब्बल ३५ कोटी रुपये गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ब्रांच मॅनेजरसह ५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ग्राहकांचे पैसे परत मिळवून देण्याचं आश्वासन बँकेने दिलं आहे.
नवी दिल्ली: बँकेतील सेव्हिंग अकाउंट आणि फिक्स डिपॉझिट (FD) मधून तब्बल ३५ कोटी रुपये गायब झाल्याची धक्कादायक तक्रार ग्राहकांनी केली आहे. ग्रेटर नोएडा येथील पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) शाखेत हा प्रकार घडला आहे. ग्राहकांच्या परस्पर त्यांच्या खात्यातून पैसे वळवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, ब्रांच मॅनेजरसह बँकेच्या पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
पीएनबीच्या सेक्टर पाय-१ (Sector Pi-1) शाखेत हा सगळा गोंधळ उघडकीस आला. खात्यातील बॅलन्स अचानक कमी झाल्याचं आणि मुदत संपण्याआधीच एफडी (FD) परस्पर मोडल्याचं ग्राहकांचं म्हणणं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांनी सुमारे ३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. मात्र, बँक किंवा पोलिसांनी अद्याप या रकमेला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
१८ तक्रारी दाखल
पैसे गमावलेल्या ग्राहकांनी बँकेबाहेर मोठी गर्दी केली होती. आपले पैसे परत मिळावेत आणि दोषींवर कडक कारवाई व्हावी, या मागणीसाठी त्यांनी बँकेसमोर धरणे आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. विजेंद्र सिंग या ग्राहकाने सांगितलं की, त्यांच्या खात्यात ८८ लाख रुपये होते, पण आता फक्त १ लाख रुपये शिल्लक आहेत. तर, हनीफ खान यांच्या सेव्हिंग अकाउंटमधून एकाच झटक्यात ३९ लाख रुपये गायब झाले. "पैसे काढल्याचा कोणताही मेसेज मला आला नाही आणि मी कोणत्याही कागदपत्रावर सहीसुद्धा केली नाही," असं हनीफ यांनी स्पष्ट केलं.
सेव्हिंग अकाउंट आणि एफडीमधून पैसे गायब झाल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. पासबुक अपडेट करण्यासाठी किंवा व्यवहारांची माहिती घेण्यासाठी ग्राहक बँकेत गेले, तेव्हा 'ऑडिट सुरू आहे' असं सांगून कर्मचाऱ्यांनी त्यांना परत पाठवलं. बँकेच्या या टोलवाटोलवीमुळे ग्राहकांना खात्याची माहिती वेळेवर मिळाली नाही आणि घोटाळा लवकर उघडकीस आला नाही, असा आरोप ग्राहकांनी केला आहे. प्रकरणाचं गांभीर्य पाहता, हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) सोपवला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय बँकेचं दक्षता पथकही (Vigilance team) या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करत आहे.
पाच कर्मचारी निलंबित
ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींनंतर बँकेने कडक पाऊल उचलत ब्रांच मॅनेजरसह पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. तसंच, या शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ग्राहकांच्या तक्रारी सोडवल्या जातील आणि गायब झालेले पैसे परत मिळवून दिले जातील, असं आश्वासन बँकेने दिलं आहे. आता नेमके किती पैसे गायब झाले आणि हा घोटाळा कोणी केला, हे तपासाअंतीच स्पष्ट होईल.




