बांगलादेशातील मेमनसिंह जिल्ह्यात एका ४३ वर्षीय हिंदू सलून चालकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. केस कापण्याचे पैसे मागितल्याच्या रागातून आरोपीने त्याच्यावर चाकूने सपासप वार केले.
जमिनीच्या वादातून एका हिंदू शिक्षकाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच, बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या झाली आहे. यामुळे अल्पसंख्याक समुदायावरील हल्ल्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. मेमनसिंह जिल्ह्यात केस कापण्याचे पैसे न दिल्याच्या वादातून एका ४३ वर्षीय सलून चालकाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली.
या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका २८ वर्षीय संशयिताला अटक केली आहे.
रबिंद्र ऋषी असे या मृत सलून चालकाचे नाव आहे. भालुका येथील मुक्तीजोद्धा मार्केटमध्ये त्यांचे 'अपूर्वा हेअर कटिंग' नावाचे सलून होते. बांगलादेशी वृत्तपत्र 'प्रथम आलो'ने दिलेल्या माहितीनुसार, रबिंद्र यांच्या गळ्यावर, छातीवर, पाठीवर आणि हातावर चाकूचे किमान १० वार करण्यात आले. मंगळवारी संध्याकाळी भालुका उपजिल्ह्यातील जमीरदिया भागात हा जीवघेणा हल्ला झाला.
सद्दाम हुसेन असे या आरोपीचे नाव आहे. उधारीवर केस कापण्यास नकार दिल्याने आणि जुने पैसे मागितल्याने सद्दामने रबिंद्र यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
हत्येच्या काही दिवस आधीच दिली होती धमकी
रबिंद्र यांची पत्नी सुचित्रा राणी ऋषी यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, सद्दाम अनेकदा तिच्या पतीकडून नशेसाठी पैसे घ्यायचा आणि केस कापण्याचे पैसेही देत नसे. या थकीत पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला होता. हत्येच्या काही दिवस आधीच सद्दामने रबिंद्र यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोपही सुचित्रा यांनी केला.
रबिंद्र यांची आई सुलक राणी ऋषी यांनी भालुका मॉडेल पोलीस ठाण्यात हत्येची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हा हल्ला झाला. रबिंद्र त्यांच्या सलूनमध्ये बसून भाऊ माणिक ऋषी यांच्याशी बोलत होते. त्याचवेळी सद्दाम धारदार चाकू घेऊन आत घुसला आणि त्याने रबिंद्र यांच्या मानेवर सपासप वार केले.
जीव वाचवण्यासाठी रबिंद्र यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. सलूनमध्ये हल्ला झाल्यानंतर ते जवळच्या एका दुकानात पळाले, तिथेही आरोपीने त्यांच्या छातीवर वार केले. त्यानंतर आश्रयासाठी रबिंद्र शेजारच्या घराच्या अंगणात धावत गेले.
पण सद्दामने त्यांचा पाठलाग सोडला नाही. त्याने रबिंद्र यांना जमिनीवर पाडले आणि त्यांच्या छातीवर, पाठीवर आणि हातावर वार करतच राहिला. या गंभीर दुखापतींमुळे रबिंद्र यांचा जागीच मृत्यू झाला.
आरोपीची रवानगी तुरुंगात, रिमांडवर सुनावणी
अटकेनंतर सद्दामला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. आरोपीच्या चौकशीसाठी पोलिसांनी पाच दिवसांची कोठडी मागितली असून, त्यावर १ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
या हत्याकांडाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
जमिनीच्या वादातून हिंदू शिक्षकाचीही झाली होती हत्या
रबिंद्र यांच्या हत्येच्या काही दिवस आधीच बांगलादेशातील दिनाजपूर जिल्ह्यात एका ५५ वर्षीय हिंदू शिक्षकाची हत्या झाली होती. मनोरंजन रॉय असे त्यांचे नाव होते. जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत त्यांना मारहाण करून ठार मारण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, रॉय हे दोन गटांमधील वाद मिटवून तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत होते, त्याचवेळी त्यांची हत्या करण्यात आली.
काही दिवसांच्या अंतराने घडलेल्या या दोन घटनांमुळे बांगलादेशातील हिंदूंच्या हत्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, या दोन्ही घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रबिंद्र यांच्या हत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.




