Pandharpur : पंढरपुरात एका विवाहित महिलेला माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी छळ केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. शारीरिक-मानसिक अत्याचारासोबतच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप असून, पती आणि कुटुंबीयांसह १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pandharpur : हुंडाबंदी कायदा अस्तित्वात असतानाही समाजात हुंड्याची प्रथा अद्याप कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पंढरपूरमध्ये एका विवाहित महिलेला माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित राजकीय कुटुंबाविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

५० लाखांसाठी छळाचा आरोप

सोलापूर येथील ऐश्वर्या श्रीमान हिचा विवाह २०१७ मध्ये पंढरपूरमधील रोहन शिंदे नाईक याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही महिने संसार सुरळीत सुरू होता. मात्र नंतर पती आणि सासरच्या कुटुंबीयांनी विविध व्यवसाय, पेट्रोल पंप आणि रोड कॉन्ट्रॅक्टसाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्याचा दबाव टाकल्याचा आरोप आहे.

शारीरिक-मानसिक अत्याचार; मूल होऊ न देण्याचा आरोप

पीडितेच्या म्हणण्यानुसार, मागणी पूर्ण न केल्यामुळे तिच्यावर वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. इतकेच नव्हे तर, “मूल झाल्यास संपत्तीवर हक्क येईल” असे सांगत तिला मूल होऊ न देण्याचाही दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

दुसरे लग्न आणि धमक्यांचा आरोप

छळाला कंटाळून ऐश्वर्या माहेरी गेल्यानंतर तिच्या पतीने घटस्फोट न घेता दुसरे लग्न केल्याचा आरोप आहे. तसेच पती, त्याचा भाऊ आणि इतर कुटुंबीयांनी माहेरी येऊन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचेही पीडितेने सांगितले आहे. “आधीही एका कुटुंबाला संपवलं आहे, तुम्हालाही संपवू,” अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

लग्नात दिलेले दागिने आणि रोख रक्कम

पीडितेच्या वडिलांनी लग्नावेळी २५ तोळे सोने, अडीच किलो चांदी आणि सुमारे २ लाख रुपये खर्च केले होते. तरीही सासरकडून अधिक पैशांची मागणी कायम ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे.

१२ जणांविरोधात गुन्हा; अटकेची प्रतीक्षा

या प्रकरणी पती, दीर (नगरसेवक राहुल) आणि इतर कुटुंबीयांसह एकूण १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तिने या प्रकरणात न्याय मिळण्याची मागणी केली आहे.