आंध्र प्रदेशमधील एका महामार्गावर बाईकस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एसयूव्ही गाडीची समोरून येणाऱ्या दुसऱ्या गाडीला धडक लागल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. एसयूव्ही गाडी चुकीच्या दिशेला जाऊन अपघात झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
शनिवारी सकाळी आंध्र प्रदेशच्या काकीनाडा जिल्ह्यातील महामार्गावर एका वृद्ध बाईकस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न जीवघेणा ठरला. एका एसयूव्ही कारने चुकीच्या दिशेने जाऊन समोरून येणाऱ्या दुसऱ्या गाडीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.
इशारा: खालील व्हिडिओमध्ये विचलित करणारी दृश्ये आहेत. पाहणाऱ्यांनी काळजी घ्यावी.
हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून रस्ते सुरक्षा, बेदरकारपणे गाडी चालवणे आणि महामार्गावर अचानक गाडी वळवण्याचे धोके याबाबत चर्चा सुरू झाली आहे. फुटेजमध्ये एक वृद्ध व्यक्ती सर्व्हिस लेनमून दुचाकीवर येऊन महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. निळ्या रंगाची एसयूव्ही जवळ येताच, दुचाकीस्वाराला धडक बसू नये म्हणून चालक अचानक विरुद्ध बाजूला गाडी वळवतो.
पण, या प्रयत्नामुळे समोरून येणाऱ्या पांढऱ्या गाडीच्या थेट मार्गात ही एसयूव्ही येते आणि दोन्ही गाड्यांची समोरासमोर भीषण धडक होते.
काकीनाडा महामार्गावरील अपघात कसा झाला?
निळ्या रंगाची एसयूव्ही वेगात असताना वृद्ध दुचाकीस्वार रस्त्यात येतो, हे सीसीटीव्हीमध्ये दिसते. दुचाकीची धडक टाळण्यासाठी चालक वेगात विरुद्ध लेनकडे गाडी वळवतो.
यानंतर एसयूव्हीची समोरून येणाऱ्या पांढऱ्या गाडीला धडक बसते. या धडकेमुळे आणखी एका दुचाकीचा अपघात होतो आणि तो दुचाकीस्वार हवेत उडताना दिसतो.
अपघातानंतर वृद्ध दुचाकीस्वार आपली गाडी वळवून घटनास्थळावरून निघून जाताना फुटेजमध्ये दिसत आहे.
या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मृत आणि जखमींची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघाताबाबत अधिक माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.
सीसीटीव्ही फुटेजवर सोशल मीडिया युजर्सची प्रतिक्रिया
या फुटेजमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून अपघाताला कोण जबाबदार आहे आणि एसयूव्ही चालकाने गाडी वळवण्याचा निर्णय योग्य होता का, यावर लोक चर्चा करत आहेत.
अनेकांनी हेल्मेटशिवाय महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वृद्ध दुचाकीस्वाराला दोष दिला.
एका युजरने म्हटले की, महामार्गाजवळ राहणारे काही लोक महामार्गाचा वापर स्थानिक रस्त्यासारखा करतात आणि सुरक्षिततेचे नियम पाळत नाहीत. दुसऱ्याने विचारले की, जे वृद्ध लोक सुरक्षितपणे गाडी चालवू शकत नाहीत, त्यांना दुचाकी चालवण्याची परवानगी द्यावी का?
वृद्ध दुचाकीस्वार घटनास्थळावरून निघून गेल्याने अनेकांनी त्याच्यावर टीका केली. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी काही युजर्सनी केली.
एकाने पळून जाणाऱ्या दुचाकीस्वारावर टीका करत म्हटले की, दुसऱ्याच्या चुकीमुळे निष्पाप लोकांना त्रास सहन करावा लागला.
काही सोशल मीडिया युजर्सनी एसयूव्ही चालकाच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित केले. वेगात विरुद्ध लेनमध्ये गाडी वळवणे अधिक धोकादायक असू शकते, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
एका युजरच्या मते, एसयूव्ही चालक खूप वेगाने चौकात आला आणि त्याने विरुद्ध लेनमध्ये जाण्याचा चुकीचा निर्णय घेतला.
अपघातामुळे रस्ते सुरक्षेवर चर्चा
वाहने वेगात असताना गर्दीच्या महामार्गांवर अचानक गाडी वळवण्याच्या धोक्यांवर या अपघाताने प्रकाश टाकला आहे.
एसयूव्ही चालकाने दुचाकी वाचवण्यासाठी गाडी वळवली असली तरी, समोरून येणाऱ्या रहदारीच्या मार्गात जाण्यामुळे मोठा अपघात झाला.
सीसीटीव्ही फुटेजमुळे हेल्मेटचा वापर, सुरक्षितपणे महामार्ग ओलांडणे, वेगावर नियंत्रण आणि दुचाकीस्वारांची जबाबदारी यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
पण, घटना नेमकी कशी घडली, वाहनांचा वेग आणि अपघातासाठी कोण जबाबदार आहे, हे अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होईल.
















