नाशिकमध्ये जिल्हा परिषदेच्या पदावरील एका अधिकाऱ्याने 30 महिलांचे लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे पेन ड्राइव्हमध्ये काही अश्लील व्हिडीओही पोलिसांच्या हाती लागले आहेत. 

मुंबई : नाशिक जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा परिषदेमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याने तब्बल ३० महिला सहकाऱ्यांचा लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.

पेन ड्राइव्हमध्ये सापडले अश्लील व्हिडिओ व चॅट्स

या अधिकाऱ्याविरोधात एका पीडित महिलेनं निनावी तक्रार केली होती. या तक्रारीसोबत सादर केलेल्या पेन ड्राइव्हमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ क्लिप्स, अश्लील चॅटिंगचे स्क्रीनशॉट्स आणि महिलांबरोबरचे आक्षेपार्ह संवाद समोर आले. या तक्रारीनंतर नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांनी तातडीने चौकशी आदेशित केली.

वरिष्ठ पदावर असल्यामुळे कोणी न बोलल्याची शक्यता

तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, संबंधित अधिकारी हा जिल्हा परिषदेत विभागप्रमुख पदावर कार्यरत होता. वरिष्ठ पदाचा गैरफायदा घेत त्याने कार्यालयातील अनेक महिलांवर मानसिक दबाव टाकत, त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्याच्या या वर्तनाविरोधात कोणी उघडपणे बोलण्यास धजावत नव्हतं.

विशाखा समिती व राज्य महिला आयोगाची चौकशी

तक्रारीची गंभीर दखल घेऊन विशाखा समितीकडून चौकशी सुरू झाली आहे. याचबरोबर राज्य महिला आयोग देखील या प्रकरणात लक्ष घालून आहे. दोन दिवसांत समितीचा अहवाल सादर होणार असून, त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

आणखी दोन अधिकाऱ्यांचा सहभाग?

या प्रकारात केवळ एकच नव्हे, तर आणखी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे तपासाचा व्याप्ती वाढवण्यात आली आहे. पीडित महिलांच्या सुरक्षेसंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, सरकारी यंत्रणेमधील महिलांसाठी सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेची हत्या

जून महिन्यातच नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमधील खरवळमध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. खरंतर, प्रेमसंबंधाला नकार दिल्याने आरोपीच्या कानशिलात देखील महिलेने लगावले होते. याच रागात आरोपीने महिलेच्या डोक्यावर वार करत तिची हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या अवघ्या 24 तासांत मुसक्या आवळल्या होत्या.