मुंबईत एका निवृत्त प्राध्यकापाला फेसबुकवरील मैत्रीणीने कोट्यावधींचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई | सोशल मीडियाच्या वाढत्या वापराचा काहीजणांकडून गैरवापर केला जातोय. अलीकडल्या काळात याच सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना लाखो-कोट्यावधींचा गंडा घातल्याच्या घटना वारंवार समोर येतात. अशातच आता मुंबईत फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेशी मैत्री करणे एका निवृत्त प्राध्यापकाला चांगलेच महागात पडले आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे ₹१.९३ कोटींची फसवणूक करण्यात आली. खार परिसरात राहणाऱ्या ६२ वर्षीय निवृत्त प्राध्यापकाने याप्रकरणी पश्चिम विभागातील सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, अज्ञात सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्राध्यापकांनी फेसबुकवर ‘आयेशा’ नावाच्या एका महिलेस फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. लवकरच तिने व्हॉट्सॲपवर संभाषण सुरू केले आणि मैत्री करून विश्वास संपादन केला. तिने स्वतःला गुरुग्राममधील 'ग्लोबल आर्ट' नावाच्या कंपनीत नोकरीला असल्याचे सांगितले आणि प्राध्यापकांना क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीबाबत गोड गोड बोलून सांगितले.

सुरुवातीच्या काही टिप्समुळे प्राध्यापकांना थोडाफार नफा झाल्याचे वाटल्याने त्यांनी अधिक रक्कम गुंतवायला सुरुवात केली. आयेशाने त्यांना बिटकॉइन व्यवहारांसाठी बायनान्सवर खाते उघडून दिले, त्यांचे आधार कार्ड, ईमेल माहिती घेतली आणि वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले.

काही दिवसांतच आयेशाने अचानक संपर्क तोडला. यानंतर एका ‘कोयल’ नावाच्या दुसऱ्या महिलेकडून प्राध्यापकांना फोन आला. तिने गमावलेले पैसे परत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. लगेचच ‘प्रशांत पाटील’ नावाच्या व्यक्तीचा फोन आला, ज्याने सांगितले की त्यांना पहिल्या टप्प्यात ₹७.५ लाख परत मिळतील, पण त्याआधी ₹४२,७३५ पैसे भरावे लागतील.

अशाप्रकारे, वेगवेगळ्या कारणांखाली सतत पैसे मागून एकूण ₹१.९३ कोटी प्राध्यापकांकडून ट्रान्सफर करून घेतले गेले. शेवटी, कोणताही परतावा मिळाला नाही आणि सर्व आरोपींनी संपर्क तोडल्यावर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

पश्चिम विभाग सायबर पोलिसांनी आयटी कायद्याच्या कलम 66(c), 66(d) आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4), 319(2), 336(2), 336(3), 338, 340(2), आणि 61(2) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सध्या आरोपींचा शोध सुरू असून सायबर पोलिस तपास करत आहेत.या प्रकारामुळे, सोशल मिडिया आणि ऑनलाइन गुंतवणूकीसारख्या गोष्टींपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.