सार

केरळमधील एका पशुवैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहाच्या बाथरूममध्ये विद्यार्थी जेएस सिद्धार्थन याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. या घटनेचा अहवाल समोर आला असून धक्कादायक माहिती समोर आली.

केरळमधील वायनाड जिल्ह्यातील एका पशुवैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहाच्या बाथरूममध्ये द्वितीय वर्षाचा विद्यार्थी जेएस सिद्धार्थन याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. या घटनेमुळे केरळमध्ये मोठी खळबळ उडाली होती. जेएस सिद्धार्थन याला मारहाण केल्याचे पोलीस तपासातून समोर आले होते. या घटनेनंतर सात आरोपींना अटक करण्यात आली.या प्रकणात सरकारने गंभीर दखल घेत या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपविला होता.

जेएस सिद्धार्थन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे आल्यानंतर सीबीआयने आतापर्यंत २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तसेच केरळ रॅगिंग प्रतिबंध कायद्याच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी केलेल्या तपासाचा अहवाल सीबीआयकडे सोपविण्यात आला असून या अहवालामधून जेएस सिद्धार्थन मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अहवालामध्ये काय माहिती ?

मृत्यूपूर्वी त्याचा काही विद्यार्थ्य़ांनी तब्बल २९ तास मानसिक छळ केला. तसेच त्याला मारहाण करण्यात आली होती, असे पोलीस अहवालात म्हटले आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. दरम्यान, जेएस सिद्धार्थनच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर काही सहकारी विद्यार्थ्यांकडून रॅगिंग केल्याचा आरोप केला होता.

जेएस सिद्धार्थनवर सतत हाताने आणि बेल्टने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यामुळे त्याला मानसिक तणावाला सामोरे जावे लागले. यातूनच आपण हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकत नाही, असे त्याला वाटल्याने त्याने आत्महत्येसारखे पाऊल उचलले असावे,असा प्राथमिक अंदाज आहे. १८ फेब्रुवारी रोजी दुपारी वसतिगृहाच्या बाथरूममध्ये जेएस सिद्धार्थन याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे अहवालात म्हटले आहे.

या घटनेवरून पोलिसांनी सुरुवातीला अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, महाविद्यालयाच्या रॅगिंग विरोधी पथकाचा अहवाल, तसेच महाविद्यालयातील काहीजणांच्या प्रतिक्रिया, शवविच्छेदन अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब, यावरून सिद्धार्थनचा काही विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे अहवालात म्हटले आहे.

राजकीय हस्तक्षेप :

या प्रकरणावर राजकीय गदारोळ झाल्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ९ मार्च रोजी सीबीआय चौकशीचे आश्वासन दिले होते. आश्वासनानंतर आठवडे उलटूनही राज्य सरकारने मुख्य फायली सीबीआयकडे सोपवल्या नसल्याचा आरोप विरोधी पक्ष काँग्रेस आणि भाजपने केल्याने हा मुद्दा मोठ्या वादात सापडला. विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी असा आरोप केला आहे की राज्य सरकारने जाणूनबुजून सीबीआय तपासाला फायली न सोपवून आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. 

आणखी वाचा :

कुख्यात गँगस्टर अरुण गवळी जेल मधून बाहेर येणार ? पण ते प्रकरण काय आणि त्यांचा या प्रकरणाशी संबंध काय ? जाणून घ्या

Maharashtra Weather : राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीटचा इशारा ! या जिल्ह्यांना अलर्ट जारी