जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये सुक्या गवताने भरलेल्या ट्रकला वर लटकणाऱ्या विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग लागली. आग लागलेली असतानाही ड्रायव्हरने हा ट्रक अरुंद आणि गर्दीच्या रस्त्यांवरून चालवत नेला आणि घरांपासून दूर नेऊन मोठा अनर्थ टाळला.

एखाद्या चित्रपटातील थरारक दृश्यासारखी एक घटना नुकतीच समोर आली आहे. एका अरुंद रस्त्यावरून चक्क आगीचा भडका उडालेला ट्रक धावत होता आणि त्याच्या अगदी वरून विजेच्या जिवंत तारा लटकत होत्या. हा अंगावर काटा आणणारा प्रकार जम्मू-काश्मीरमध्ये घडला. राजौरी शहरातील लोअर जवाहर नगर भागात सुक्या गवताने भरलेल्या एका ट्रकला अचानक आग लागली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गवतामुळे आग वेगाने पसरत होती, पण त्याहूनही भयंकर गोष्ट म्हणजे रस्त्यावर लटकणाऱ्या विजेच्या तारा. यामुळे बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

सुरुवातीला ट्रक ड्रायव्हरला मागे लागलेल्या या भयंकर आगीची काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे तो तसाच ट्रक चालवत राहिला. व्हायरल क्लिपमध्ये स्पष्ट दिसतंय की, हा ट्रक थुड्डी या अत्यंत गर्दीच्या भागातून जात होता. एका क्षणी तर आगीच्या ज्वाळांनी वरच्या विजेच्या तारांनाही स्पर्श केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकमधील सुक्या गवताचा वरच्या विजेच्या तारांना स्पर्श झाला आणि तिथूनच आगीला सुरुवात झाली. धोका खूप मोठा होता, पण ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत हा जळता ट्रक रहिवासी भागातून आणि घरांपासून दूर नेला. त्याच्या या धाडसामुळे एक मोठा अनर्थ टळला.

पाहा हा व्हायरल व्हिडिओ

Scroll to load tweet…

अशीच आणखी एक घटना

मध्य प्रदेशातही अशीच एक धक्कादायक घटना घडली. ट्रॅक्टर-ट्रॉलीवर विजेची जिवंत तार पडल्याने दोघांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. नवरात्री उत्सवानंतर दुर्गा मूर्तीच्या विसर्जनासाठी ही मूर्ती ट्रॅक्टर-ट्रॉलीवरून नेली जात होती.

मध्य प्रदेशातील जबलपूर भागात गुरुवारी, २० ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. या दुर्घटनेत आणखी सहा जण जखमी झाले आहेत.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पन्नासहून अधिक लोक सिव्हिल लाईन पथावरून नरिली तलावात विसर्जनासाठी मूर्तीची मिरवणूक काढत होते. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या मझौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री १२:०४ वाजता हा भयंकर अपघात झाला.