सार

Cyber Fraud In Bihar : बिहारमध्ये लोकांची फसवणूक करण्याचे अनोखे प्रकरण समोर आले आहे. पीडित व्यक्तीने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब एजन्सीच्या नावाने लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास आला आहे. 

Cyber Fraud In Bihar : पैशांसह अन्य मौल्यवान गोष्टी मिळवण्यासाठी लोकांची फसवणूक केल्याची कित्येक प्रकरणे आजवर आपण ऐकली असतील. पण बिहारमधील फसवणुकीचा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

लोकांना गंडा घालणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लोकांची फसवणूक करण्यासाठी या टोळीने एक आगळीवेगळी योजना तयार केली केली होती.

याप्रकरणी नवादा पोलिसांनी (Nawada) आठ जणांच्या टोळीला अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान हादरवणारी माहिती समोर आली. ही टोळी ‘ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब एजन्सी’च्या (All India Pregnant Job Agency) नावाखाली लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे काढण्याचे काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ऑल इंडिया प्रेग्नेंट एजन्सी नेमके काय करायची काम?

फसवणूक करणाऱ्या या टोळीने महिलांना गरोदर करून त्याबदलत्यात पैसे कमावण्याची योजना सुरू केली होती. ज्या महिलांना मुल होत नाहीय, अशा महिलांसाठी एजन्सी काम करत असल्याची माहिती ही टोळी फोनद्वारे देत असे.

इतकंच नव्हे तर एखाद्या महिलेला प्रेग्नेंट केले तर 13 लाख रुपयांचे बंपर बक्षीस देण्यात येईल, असे आमिष दाखवून ही एजन्सी पुरुषांना आपल्या रॅकेटमध्ये सहभागी करून घेत असे. याकरिता कंपनीमध्ये नाव नोंदणीच्या नावाखाली टोळी पुरुषांकडून 799 रूपये घेत असे. तसेच महिलेची निवड केल्यानंतर नोंदणी करणाऱ्या संबंधित पुरुषाला सुरक्षित ठेव म्हणून 5 हजार रूपये ते 20 हजार रूपये जमा करण्यास सांगितले जायचे.

जाळ्यात सहज अडकायचे बेरोजगार

13 लाख रूपये कमावण्याची संधीची माहिती दिल्यानंतर लोक सहज या टोळीच्या जाळ्यात अडकत होते. त्यांना असे वाटायचे की 799 रूपये देऊन आपण 13 लाख रूपये कमावू शकतात. इतकंच नव्हे तर महिला गर्भधारणा करू शकली नाही, तरीही 5 लाख रूपयांचे बक्षीस दिले जाईल, असे आमिषही एजन्सीकडून लोकांना दिले गेले होते.

लोकांना वाटायचे की केवळ महिलांना प्रेग्नेंट करण्याचेच काम आहे आणि मोबदल्यात पैसैही मिळणार आहेत, त्यामुळे लोक या टोळीच्या जाळ्यात सहज अडकत होते. पण एका पीडित व्यक्तीने पोलिसांना संपर्क साधला, तेव्हा या एजन्सीचा पर्दाफाश झाला. नवादा पोलिसांनी याप्रकरणी सध्या आठ जणांना अटक केली असून याप्रकरणी सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा :

धक्कादायक! प्रियकरासोबत पळाली अल्पवयीन मुलगी, रेल्वे ट्रॅकवर सापडले तरुणाच्या शरीराचे तुकडे

NewsClick Case: आरोपी प्रमुख HR अमित चक्रवर्ती सरकारी साक्षीदार होण्यास तयार, कोर्टाकडे मागितली परवानगी

US Crime : कोण आहे प्रियंका तिवारी? जिने अमेरिकेत स्वतःच्याच 10 वर्षीय मुलाची केली हत्या, कुजलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह