रिलायन्स इंडस्ट्रीच्या ४९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी जिओ प्लॅटफॉर्मच्या आयपीओची घोषणा केली आहे. हा भारतातील सर्वात मोठा आयपीओ ठरणार असून, कंपनी २७ कोटी नवीन इक्विटी शेअर जारी करणार आहे. या आयपीओची जबाबदारी अंबानी कुटुंबाची तिसरी पिढी सांभाळणार आहे.

देशातील सर्वात मोठी आयपीओ म्हणून गुंतवणूकदारांची जिओ प्लॅटफॉर्मकडे नजर लागली आहे. हा आयपीओ आता लवकरच मार्केटमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. नुकतीच रिलायन्स इंडस्ट्रीची ४९वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पाडली. त्यावेळी मुकेश अंबानी यांनी याबाबतची घोषणा केली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

काय म्हणाले मुकेश अंबानी? 

यावेळी मुकेश अंबानी यांनी सांगितलं की, कंपनीचा आयपीओ हा लवकरच सेबीकडे सादर करण्यात येणार आहे. त्यांनी या निर्णयाला कंपनीच्या वाटचालीतील महत्वपूर्ण पाऊल म्हटलं आहे. या आयपीओच्या अंतर्गत कंपनी लवकरच २७ कोटी नवीन इक्विटी शेअर जारी करणार आहे.

भारताच्या शेअर मार्केटमधील ठरणार सर्वात मोठा आयपीओ 

हा आयपीओ भारताच्या शेअर मार्केटमधील सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. जिओच्या मजबूत आर्थिक गुंतवणुकीमुळे हा आयपीओ गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईब केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी मुकेश अंबानी यांनी जिओ भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी, डिजिटल सेवा विस्तार आणि नव्या तंत्रज्ञानावर भर देणार असल्याचं म्हटलं आहे.

जीओची आयपीओ प्रक्रिया कोण पाहणार? 

जीओची आयपीओ प्रक्रिया सांभाळण्याची जबाबदारी अंबानी कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीकडे सोपवण्यात येणार आहे. आकाश अंबानी, इशा अंबानी आणि अनंत अंबानी या पुढील मोहिमेचे सारथ्य करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष आता जिओ कंपनीच्या आयपीओकडे लागून राहिले आहे.