Viral video : न्यूयॉर्कचा टाइम्स स्क्वेअर दिल्लीच्या बाजारांसारखा दिसतो, असा व्हिडिओ शीना दलाल बिस्लाने शेअर केला आहे. रस्त्यावरील विक्रेत्यांनी भरलेल्या टाइम्स स्क्वेअरच्या व्हिडिओमुळे स्थलांतर आणि संस्कृतींच्या जागतिकीकरणावर चर्चा सुरू झाली आहे.

Viral video : मुंबईसारख्या महानगरीत फेरीवाल्यांची समस्या कायम आहे. न्यायालयाने आदेशानंतर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते, पण ती तात्पुरत्या स्वरुपाची असते. त्यामुळे काही काळानंतर तेच फेरीवाले त्याच ठिकाणी बसल्याचे पाहायला मिळते. हे फेरीवाले फूटपाथ बळकावत असल्याने पादचाऱ्यांना चालणे मुश्किल होते. तथापि, ही समस्या भारतापुरती राहिलेली नाही. जागतिक झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यात स्थलांतरित नागरिक असल्याचेही समोर आले आहे.

गेल्या काही काळापासून युरोप, कॅनडा आणि यूएसमध्ये जगाने पाहिलेले सर्वात मोठे स्थलांतर झाले आहे. स्थलांतरातील या अभूतपूर्व वाढीमुळे त्या-त्या देशांची संस्कृती आणि विविधता नष्ट होत असल्याची तक्रारही समोर आली आहे. नुकताच शीना दलाल बिस्ला नावाच्या एका कंटेंट क्रिएटरने शेअर केलेला व्हिडिओ स्थलांतरामुळे निर्माण होणाऱ्या नवीन जगावर प्रकाश टाकतो. यानंतर स्थलांतरितांवर टीका करणाऱ्या अनेक पोस्ट्स समोर आल्या.

दिल्ली की टाइम्स स्क्वेअर?

शीनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरचा एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओ शेअर करताना तिने विचारले की, हा टाइम्स स्क्वेअर आहे की दिल्ली? रस्त्याच्या कडेला होणारा (फेरीवाल्यांचा) उत्साही व्यापार आता ग्लोबल झाला आहे, असेही तिने लिहिले. शीनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जॅकेट्स, खेळणी, विंटर कॅप्स आणि स्ट्रीट फूड विकणारे रस्त्यावरील स्टॉल्स दिसत आहेत. एक-दोन नव्हे, तर संपूर्ण रस्ता फेरीवाल्यांनी भरलेला आहे. तिने न्यूयॉर्क आणि दिल्लीच्या पालिका बाजारातील दृश्यांमधील साम्य दाखवले. तसेच, तिने व्हिडिओमध्ये चांदनी चौक बाजाराच्या उत्साहाचाही उल्लेख केला. त्या गजबजलेल्या रस्त्यावरून ती आपला व्हिडिओ बनवत पुढे चालली होती.

View post on Instagram

दिल्ली आधीच ग्लोबल आहे

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युझरने लिहिले की, 'खरे तर, उंच इमारतींसोबत हिवाळ्याच्या संध्याकाळी हे ठिकाण पालिका बाजारसारखे दिसते.' दुसऱ्या एका युझरने लिहिले की, 'स्ट्रीट शॉपिंगचा अनुभव सार्वत्रिक आहे, फक्त पार्श्वभूमी बदलते.' आणखी एका युझरने कमेंट केली की, 'चांदनी चौकाची ऊर्जा जगात कुठेही अनुभवता येते.' तर दुसऱ्या एका युझरच्या मते, ‘मूलतः दिल्ली आधीच ग्लोबल आहे.’