ब्राझीलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक रहस्यमय आणि अतिशय वेगवान प्रकाश कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लोक याची तुलना डीसी सुपरहिरो 'द फ्लॅश'शी करत आहेत.

मुंबई : ब्राझीलमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक डोळे दिपवणारा रहस्यमय प्रकाश कैद झाला आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवली आहे. अनेक जण याची तुलना डीसी सुपरहिरो 'द फ्लॅश'शी करत आहेत. पोंटा ग्रोसा शहरात हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओत रस्त्यावरून एका सेकंदाच्या आत एक अत्यंत तेजस्वी प्रकाश वेगाने जाताना दिसतो. हे नेमकं काय होतं, असा प्रश्न आता लोकांना पडला आहे.

हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काही जणांना हा प्रकाश 'द फ्लॅश'सारखा वाटत आहे, तर काहींच्या मते हा फक्त एखादा कीटक असू शकतो, जो सीसीटीव्हीच्या लेन्सजवळून उडत असावा.

Scroll to load tweet…

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या भागात हा प्रकार घडला तिथे तेव्हा वादळी हवामान होतं. त्यामुळे हा प्रकाश एखाद्या वातावरणीय किंवा विद्युतीय घटनेमुळे निर्माण झाला असावा, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. पण एशियानेट न्यूज मराठी या व्हायरल व्हिडीओची पुष्टी करत नाही. कारण हा व्हिडीओ एडिटेड असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

मीडियाटिकोच्या एका रिपोर्टनुसार, २४ नोव्हेंबरला स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६:३४ वाजता ब्राझीलच्या पराना राज्यातील पोंटा ग्रोसा येथे ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे. पावसाला सुरुवात होण्याआधी या रहस्यमय प्रकाशामुळे संपूर्ण रस्ता काही क्षणांसाठी उजळून निघाला होता, असं स्थानिक नागरिकांनी सांगितल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

विशेष म्हणजे, या घटनेपूर्वी ब्राझीलच्या राष्ट्रीय हवामान संस्थेने (INMET) पोंटा ग्रोसासाठी रेड-लेव्हलचा हवामान अलर्ट जारी केला होता. त्यात नागरिकांना धोकादायक हवामानाचा इशारा देण्यात आला होता. हा अलर्ट संध्याकाळी ६:२२ वाजता जारी करण्यात आला होता, म्हणजेच सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद होण्याच्या अवघ्या १२ मिनिटे आधी.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, शहरात दुपार आणि संध्याकाळच्या वेळी जोरदार वारे वाहत होते. या वाऱ्याचा वेग इतका जास्त होता की, शहरातील मध्यवर्ती भागात एक झाडही उन्मळून पडलं होतं.

या व्हिडीओची तुलना 'द फ्लॅश'शी का केली जातेय?

'द फ्लॅश' हा डीसी कॉमिक्सच्या सर्वात लोकप्रिय सुपरहिरोंपैकी एक आहे, जो त्याच्या अफाट वेगासाठी ओळखला जातो. तो जेव्हा वेगाने धावतो, तेव्हा त्याच्यामागे प्रकाशाचा एक पट्टा आणि विजेसारखा ट्रेल दिसतो.

ब्राझीलमधील या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा रहस्यमय प्रकाश आणि 'द फ्लॅश'च्या धावण्याची स्टाईल यात बरंच साम्य आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर याची तुफान चर्चा सुरू झाली असून, अनेकांनी 'द फ्लॅश' परानामध्ये आला असावा, अशी चेष्टा केली आहे.

हा प्रकाश म्हणजे एखादी उडती बशी (UFO) असू शकते किंवा काहीतरी वेगळी वातावरणीय घटना असावी, असेही तर्क लावले जात आहेत. मात्र, अद्याप या रहस्यमय प्रकाशामागील खरं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही.