२०२४ च्या निदर्शनांसंबंधी प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची बहीण अलिमा खान यांच्या केसचा निकाल दहशतवादविरोधी न्यायालयाने १६ डिसेंबरपर्यंत राखून ठेवला आहे. सुनावणीविना निकाल लांबणीवर पडल्याने अलिमा यांच्या वकिलांनी संताप व्यक्त केला आहे.

पाकिस्तानच्या एका दहशतवादविरोधी न्यायालयाने गुरुवारी इम्रान खान यांची बहीण अलिमा खान यांच्या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला. स्थानिक मीडियानुसार, हे प्रकरण २०२४ च्या आंदोलनाशी जोडलेले आहे. 'द एक्स्प्रेस ट्रिब्यून' च्या वृत्तानुसार, २६ नोव्हेंबरच्या निदर्शनांसंबंधी केसच्या निकालाची तारीख आता १६ डिसेंबर करण्यात आली आहे.

अलिमा यांच्यावरील आरोप

२०२४ मध्ये पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) च्या १० हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी इस्लामाबादमध्ये मोर्चा काढला होता. पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांच्या सुटकेसाठी त्यांनी सरकारी बंदी मोडून सुरक्षा दलांशी झटापट केली होती.

या प्रकरणात अनेक पीटीआय नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. सादिकाबाद पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या एफआयआरमध्ये अलिमा आणि इतर १० जणांची नावं आहेत.

सुनावणी न घेताच निकाल लांबणीवर

'द डॉन' च्या वृत्तानुसार, गुरुवारी न्यायाधीश अमजद अली शाह यांनी कोणतीही नवी सुनावणी न घेता या केसचा निकाल राखून ठेवला. इम्रान खान यांच्या तीन बहिणी- नोरीन नियाझी, उझमा खान आणि अलिमा खान यांना गेल्या सप्टेंबरमध्ये मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर (MPO) च्या कलम ३ अंतर्गत ताब्यात घेण्यात आलं होतं. देशभरात इम्रान खान यांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या निदर्शनांना रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं.

या महिन्याच्या सुरुवातीला पंजाब प्रांतीय अधिकाऱ्यांनी एमपीओ कायद्यांतर्गत अटकेचे आदेश मागे घेतल्यानंतर नोरीन आणि उझमा खान यांची तुरुंगातून सुटका झाली. पण अलिमा अद्याप लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात आहेत. बचाव पक्षाचा युक्तिवाद न ऐकताच निकाल राखून ठेवल्याबद्दल अलिमा यांच्या वकिलांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. आपल्याला म्हणणं मांडण्याची संधीच दिली गेली नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

गेल्या २२ सप्टेंबरला न्यायालयाने सुरुवातीला निकाल राखून ठेवला होता आणि २५ सप्टेंबरला तो जाहीर करण्याची तारीख ठरवली होती. पण न्यायाधीश शाह रजेवर असल्याने ती तारीख पुढे ढकलून १ ऑक्टोबर करण्यात आली. त्यानंतर निकाल वारंवार लांबणीवर पडला आहे. आता हा निकाल १६ डिसेंबरपर्यंत गेला आहे. ७४ वर्षीय पीटीआय संस्थापक इम्रान खान २०२३ पासून तुरुंगात आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि हिंसेला चिथावणी देण्यासह १०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनाही १७ जानेवारी २०२५ ला दुसऱ्या एका केसमध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं. या केसमध्ये दोघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी, पाकिस्तानच्या दोन प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनी इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्या ढासळत्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाच्या तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली. याआधी गेल्या आठवड्यात इम्रान खान यांनी तीन न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांना खुलं पत्र लिहून स्वतःच्या आणि पत्नीच्या उपचारांसाठी विनंती केली होती.