US Iran Talks Collapse After 21 Hours : अमेरिका आणि इराण यांच्यात तब्बल २१ तास चाललेली चर्चा अखेर फिसकटली आहे. इराणने अण्वस्त्रं बनवू नयेत ही आमची मुख्य अट होती, पण ती त्यांनी मान्य केली नाही. 

US Iran Talks Collapse After 21 Hours : अमेरिका आणि इराण यांच्यात झालेली चर्चा कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकली नाही, असं अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी स्पष्ट केलं आहे. तब्बल २१ तास ही मॅरेथॉन चर्चा चालली. "आम्ही एक रेड लाईन निश्चित केली होती. इराणने अणुबॉम्ब बनवू नये, ही आमची प्रमुख अट आहे. ही अमेरिकेची शेवटची आणि सर्वोत्तम ऑफर होती. आता इराण ती स्वीकारणार की नाही, याची आम्ही वाट पाहत आहोत," असं जेडी व्हान्स म्हणाले.

व्हान्स यांनी माध्यमांना सांगितलं, "त्यांनी आमच्या अटी स्वीकारण्यास नकार दिला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्हाला एक करार करण्याचा प्रयत्न करण्यास सांगितलं होतं. पण दुर्दैवाने, यात कोणतीही प्रगती झाली नाही." गेल्या ४० दिवसांपासून पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा काढण्यात अपयश आल्याने ही चर्चा फिस्कटली आहे. दरम्यान, इराण आणि त्यांच्या समर्थक गटांविरुद्ध युद्ध सुरूच राहील, असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे.

या चर्चेचा निकाल काहीही लागो, अमेरिकाच जिंकेल आणि आपल्याला निकालाची कोणतीही चिंता नाही, असं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कालच म्हटलं होतं. चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात झाली असली तरी, त्यातून काही सकारात्मक माहिती समोर येत नसल्याचं इराणच्या वृत्तसंस्थांनी आधीच स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता जेडी व्हान्स यांनी चर्चा फिसकटल्याचं जाहीर केलं आहे. दुसरीकडे, काही निर्बंधांसह होरमुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आल्याचं इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने म्हटलं आहे. मात्र, लष्करी जहाजांना प्रवेश दिला जाणार नाही, यावर इराण ठाम आहे.

२१ तासांची मॅरेथॉन चर्चा

इस्लामाबादमध्ये शनिवारी झालेल्या या बैठकीचं नेतृत्व अमेरिकेकडून उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी, तर इराणकडून तिथल्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी केलं. अमेरिकेच्या शिष्टमंडळात व्हान्स यांच्यासोबत स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर होते, तर इराणच्या बाजूने परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची सहभागी झाले होते. याशिवाय अणुऊर्जा, अर्थव्यवस्था, लष्कर आणि कायदा क्षेत्रातील तज्ज्ञही दोन्ही बाजूंकडून उपस्थित होते. इराणविरुद्धचं युद्ध संपवणं, लेबनॉनमधील इस्रायली हल्ले थांबवणं, होरमुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूक आणि इराणचा अणुकार्यक्रम हे महत्त्वाचे मुद्दे चर्चेत होते. मात्र, अणुकार्यक्रमावरील चर्चेतच मुख्य अडथळा निर्माण झाला. देशातील युरेनियमचा साठा बाहेर हलवण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव इराणने फेटाळून लावल्याचं इराणच्या माध्यमांनी म्हटलं आहे.