इस्रायल-इराण युद्ध tension: इस्रायल-इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने आपली अणुचालित विमानवाहू युद्धनौका यूएसएस निमित्ज दक्षिण चिनी समुद्रातून मध्य आशियाकडे रवाना केली आहे. 

वॉशिंग्टन: इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या 'यूएसएस निमित्ज' या अणुचालित विमानवाहू युद्धनौकेला दक्षिण चिनी समुद्रातून थेट पश्चिमेकडे – मध्य आशियाच्या दिशेनं रवाना केलं आहे. हा निर्णय अमेरिकेच्या युद्धसज्जतेचा आणि इस्रायलच्या पाठिंब्याचा स्पष्ट संदेश मानला जात आहे.

यूएसएस निमित्ज सध्या युद्धसज्ज अवस्थेत असून, डानांग (व्हिएतनाम) येथे नियोजित स्वागत समारंभ अचानक रद्द करण्यात आला आहे. या निर्णयामागे अमेरिकेचं धोरणात्मक परिवर्तन असल्याचे संकेत आहेत.

डानांगमधील समारंभ रद्द, अमेरिका युद्धाच्या तयारीत

यूएसएस निमित्ज २० जून रोजी व्हिएतनामच्या डानांग बंदरात पोहोचणार होतं, जिथे एक भव्य स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र, इस्रायल-इराण संघर्षाचा वाढता तणाव लक्षात घेऊन अमेरिका तात्काळ कृतीत उतरली असून, समारंभ रद्द करून निमित्ज कॅरिअरला युद्धाच्या संभाव्य क्षेत्राकडे वळवलं आहे.

शिप ट्रॅकिंग वेबसाइटनं उघड केली हालचाल

शिप ट्रॅकिंग वेबसाइट ‘मरिन ट्रॅफिक’नं दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी यूएसएस निमित्ज दक्षिण चिनी समुद्रातून पश्चिम दिशेने हालचाल करताना दिसून आली. ही दिशा थेट मध्य आशियाच्या संभाव्य युद्धक्षेत्राकडे असल्याचं स्पष्ट होतं.

इराणकडून आणखी तणावाची चिन्हं, अणु करार रद्द करण्याचा विचार

दरम्यान, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघई यांनी दिलेल्या निवेदनात एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितलं की, इराण आता अणु करारातून बाहेर पडण्याचा गंभीर विचार करत आहे. “आम्ही सामूहिक विनाशाच्या शस्त्रांच्या विरोधात आहोत, परंतु आमची सहनशीलतेची मर्यादा ओलांडली जात आहे,” असं ते म्हणाले.

निमित्ज कॅरिअरवर युद्धसज्ज लढाऊ विमाने?

यूएसएस निमित्ज कॅरिअर स्ट्राईक ग्रुपने नुकताच दक्षिण चिनी समुद्रात सागरी सुरक्षा ऑपरेशन पार पाडलं होतं. सध्या त्यावर लढाऊ विमाने आहेत की नाही, याबाबत स्पष्ट माहिती नाही. मात्र, अशा युद्धनौका पूर्ण सज्ज अवस्थेतच पुढे पाठवण्यात येतात, हे लष्करी धोरण समजतं.

अमेरिकेच्या या हालचालीमुळे मध्य आशियामध्ये निर्माण होणाऱ्या युद्धसदृश परिस्थितीला नव्या वळणाची शक्यता आहे. इस्रायलसाठी ही एक प्रकारे सामरिक दिलासा देणारी वेळ असली, तरी जागतिक शांततेसाठी ही स्थिती धोक्याची घंटा ठरत आहे.