सार

युकेंमधील एका सामुदायिक उद्यानात लोक आपल्या प्रियजनांची अस्थी विखुरत आहेत. यामुळे उद्यान देखभालीसाठी अडचणी निर्माण होत असल्याने ही पद्धत थांबवावी, अशी विनंती उद्यानपालकांनी केली आहे. (प्रतिकात्मक चित्र)

यूकेंमधील लोक सामुदायिक उद्यानात अस्थी विखुरण्याची सवय लावून घेत आहेत. कारण काहीही असले तरी ही पद्धत थांबवावी, अशी विनंती उद्यानपालकांनी केली आहे. इंग्लंडमधील कॉर्नवॉलमधील नदीकाठच्या सामुदायिक उद्यानात लोक आपल्या प्रियजनांची अस्थी विखुरण्याची प्रथा सुरू झाली आहे.

ट्रुरो नदीकाठी असलेल्या एका ओसाड जागेचे रक्षण करण्यासाठी सामुदायिक उद्यान ही संकल्पना राबवण्यात आली. 'फ्रेंड्स ऑफ सनी कॉर्नर' हा गट ही योजना राबवत आहे. २०१६ पासून हा गट या परिसराचे रक्षण करण्यासाठी काम करत आहे. मात्र, आता येथील माळींना एका अनपेक्षित समस्येचा सामना करावा लागत आहे. लोकांनी आपल्या प्रियजनांची अस्थी उद्यानात विखुरण्यास सुरुवात केल्याने त्यांना आव्हान निर्माण झाले आहे.

 

आपल्या प्रियजनांना सर्वात सुंदर असा शेवटचा विसावा देण्याच्या उद्देशाने स्थानिक लोक येथील उद्यानात अस्थी विखुरत आहेत. मात्र, त्यामुळे उद्यान देखभालीसाठी मोठे आव्हान निर्माण होत असल्याचे माळी सांगतात. त्यामुळे ही सवय थांबवावी, अशी विनंती ते करतात. परवानगीशिवाय लोक उद्यानात अस्थी विखुरत असल्याचे 'फ्रेंड्स ऑफ सनी कॉर्नर'चे अध्यक्ष पॉल करुवान यांनी सांगितले.

उद्यान देखभालीसाठी स्वयंसेवकांना यामुळे मोठी अडचण येत असल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यावरणीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यास, जमीन मालकाच्या संमतीने युकेंमध्ये अस्थी विसर्जन करणे कायदेशीर आहे. मात्र, येथे उद्यान चालकांची परवानगी न घेता लोक असे वागत असल्याचेही त्यांनी सांगितले.