युएईमध्ये व्यवसाय करणाऱ्या हसिना निषाद आणि त्यांचे पती निषाद हुसेन या मल्याळी जोडप्याने आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क नवे आयफोन गिफ्ट केले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचं कौतुक करण्यासाठी त्यांनी हे खास सरप्राईज दिलं.

युएईमध्ये व्यवसाय करणाऱ्या एका मल्याळी जोडप्याने आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क नवे आयफोन गिफ्ट केले आहेत. सध्या या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. मूळचे केरळचे असलेले कंपनीचे मालक निषाद हुसेन आणि त्यांच्या पत्नी हसिना निषाद यांनी कर्मचाऱ्यांसाठी हा खास सरप्राईज प्लॅन आखला होता. या अनोख्या गिफ्ट वाटपाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, 'तुमच्या कंपनीत नोकरी मिळेल का?' असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत.

भन्नाट सरप्राईज

सुरुवातीला एका टेबलावर अनेक गिफ्ट बॉक्स ठेवण्यात आले होते. प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यातून एक बॉक्स निवडायचा होता. जेव्हा कर्मचाऱ्यांनी बॉक्स उघडले, तेव्हा काहींना त्यात चकाचक आयफोन मिळाले, तर काहींच्या बॉक्समध्ये फक्त चॉकलेट्स होते. आयफोन मिळालेले आणि चॉकलेट मिळालेले कर्मचारी यांच्यात थोडी निराशा दिसली, पण खरा ट्विस्ट तर पुढेच होता.

View post on Instagram
 

ज्या कर्मचाऱ्यांना सुरुवातीला चॉकलेट्स मिळाले होते, त्यांनाही नंतर नवे आयफोन देण्यात आले. शेवटी सर्वांच्या हातात एकसारखंच आणि भारी गिफ्ट होतं. कर्मचाऱ्यांची मेहनत आणि टीमवर्क यामुळेच कंपनीची प्रगती होत असल्याचं हसिना निषाद यांनी या व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याचे प्रयत्न, त्यांच्या कल्पना आणि योगदान कंपनीच्या यशासाठी खूप महत्त्वाचे आहेत, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

नेटकरी विचारतायत, नोकरी मिळेल का?

या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत. अनेकांनी कंपनीच्या या दिलदारपणाचं कौतुक केलं आहे. 'मलाही तुमच्या कंपनीत जॉईन व्हायचंय', 'काही जागा रिकामी आहे का?' अशा मजेशीर कमेंट्स युजर्स करत आहेत. आयफोन देण्यापेक्षाही, मालक आपल्या कर्मचाऱ्यांची जी काळजी घेतात, ती गोष्ट जास्त महत्त्वाची असल्याचं मत अनेक नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.