अॅपलचा नवा आयफोन 18 ए20 प्रोसेसर, 120 हर्ट्झ डिस्प्ले आणि अत्याधुनिक एआय फीचर्ससह मार्च 2027 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. या फोनची किंमत एक लाखाच्या आसपास असू शकते, अशी माहिती समोर येत आहे.

अॅपलचा नवा स्टँडर्ड आयफोन, आयफोन 18 बाबतची माहिती समोर येत आहे. हा फोन नवा ए20 प्रोसेसर, 120 हर्ट्झ डिस्प्ले, चांगली बॅटरी आणि एआय फीचर्ससह येणार असल्याची शक्यता आहे. पण, त्याची किंमत 1 लाखाच्या घरात असू शकते, या रिपोर्टमुळे ग्राहकांची चिंता वाढली आहे.

मार्चमध्ये लाँच होण्याची शक्यता

आयफोन 18, आयफोन 18ई आणि आयफोन एअर 2 मॉडेल्स फेब्रुवारी ते एप्रिल 2027 या दरम्यान लाँच केले जाऊ शकतात. मार्चमध्ये लाँच होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. सॅमसंग डिस्प्ले आणि एलजी डिस्प्लेने या नव्या फोनसाठी ओएलईडी पॅनल्सच्या उत्पादनाची तयारी सुरू केल्याचेही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

किंमत 1 लाखाच्या घरात जाणार का?

टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत आयफोन 18 ची बेस प्राईस 100 डॉलरने वाढून 999 डॉलर होऊ शकते. भारतातही याची किंमत 1 लाखाच्या जवळपास जाण्याची शक्यता आहे. आयफोन 17 ची सध्याची संभाव्य किंमत 99,900 रुपये असल्याचे बोलले जात आहे. पण, अॅपलने अद्याप किंमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

ए20 प्रोसेसर आणि जास्त रॅम

या फोनला 2 नॅनोमीटर तंत्रज्ञानावर आधारित ए20 प्रोसेसरची ताकद मिळेल. आधीच्या मॉडेल्सच्या तुलनेत हा 30 टक्के कमी वीज वापरेल, असा अंदाज आहे. यात 9 जीबी किंवा 12 जीबी रॅम आणि नवा सी2 मोडेम असू शकतो.

कॅमेरा आणि डिझाईनमधील बदल

यात 48 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आणि 48 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाईड कॅमेरा कायम राहण्याची शक्यता आहे. फ्रंट कॅमेरा 24 मेगापिक्सेलचा असू शकतो. 6.3 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळण्याची अपेक्षा आहे. कॅमेरा कंट्रोल बटनमध्येही बदल होऊ शकतात.

आयओएस 27 मधील नवीन सिरीw

हा फोन आयओएस 27 वर चालेल. गुगलच्या मदतीने विकसित केलेली अधिक सक्षम सिरी आणि नवीन एआय फीचर्स यात मिळू शकतात. मात्र, किंमत, फीचर्स आणि लाँचिंगच्या तारखेबाबत अॅपलची अधिकृत घोषणा येणे बाकी आहे.