SpaceX Offers Free Starlink Internet In Iran Amid Protests : इराणमध्ये स्टारलिंक इंटरनेट उपलब्ध होताच, लष्कराने जॅमर वापरून ही सेवा खंडित केल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिले आहे.
SpaceX Offers Free Starlink Internet In Iran Amid Protests : अयातुल्ला खामेनी सरकारच्या विरोधातील निदर्शने दडपण्यासाठी इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद केल्यानंतर इराणने स्टारलिंकच्या वापरावरही बंदी घातली होती. आंदोलकांचे संवादाचे मार्ग तोडण्याच्या उद्देशाने स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवा बंद करणाऱ्या इराणला प्रत्युत्तर म्हणून इलॉन मस्कच्या SpaceX ने मोफत स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवा दिली होती. आता SpaceX ने उपलब्ध करून दिलेली ही मोफत स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवादेखील इराणने खंडित केल्याचे वृत्त आहे.
इराणमध्ये स्टारलिंक इंटरनेट उपलब्ध होताच, लष्कराने जॅमर वापरून ही सेवा खंडित केल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मस्क यांच्याशी बोलणार असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतरच SpaceX ने इराणमध्ये स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवा दिली. SpaceX ने इराणमधील स्टारलिंक सबस्क्रिप्शन फी माफ केली, ज्यामुळे देशात रिसीव्हर असलेल्या लोकांना पैसे न देता इंटरनेट सेवा वापरण्याची संधी मिळाली. मात्र, काही तासांतच इराणी लष्कराने हा प्रयत्न हाणून पाडला.
इराणमध्ये स्टारलिंक वापरणे हा सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकणारा गुन्हा आहे. जर हे हेरगिरी मानले गेले, तर फाशीची शिक्षाही होऊ शकते आणि इराणने तसा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील आंदोलकांना मदतीचे आश्वासन दिले आहे. ट्रम्प यांनी आंदोलकांना त्यांची निदर्शने सुरू ठेवण्यास सांगितले असून, इराणमध्ये 'लवकरच मदत पोहोचेल' असे म्हटले आहे. इराणमध्ये आठवडाभर चाललेल्या सरकारविरोधी आंदोलनानंतर झालेल्या कारवाईत सुमारे २,००० लोक मारले गेल्याची माहिती समोर येत असताना ट्रम्प यांचे हे विधान आले आहे.


