दक्षिण कोरियात एका २४ वर्षीय तरुणाने आपल्या प्रेयसीला ३ तास २० मिनिटांत तब्बल ५१४ वेळा मारहाण करत तिची हत्या केली. एसबीएसच्या 'अनअन्सर्ड क्वेश्चन्स' या शोमध्ये हे प्रकरण समोर आलं आहे.

एका तरुणाने आपल्या प्रेयसीला ३ तास २० मिनिटांत तब्बल ५१४ वेळा मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला. 'गँगसेओ टॉर्चर मर्डर' (Gangseo torture murder) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकरणाची माहिती २४ ऑक्टोबर रोजी एसबीएसच्या (SBS) 'अनअन्सर्ड क्वेश्चन्स' या इन्व्हेस्टिगेशन शोमध्ये देण्यात आली.

२० जून रोजी दुपारी २:२० च्या सुमारास, २४ वर्षीय जिओनने (Jeon) त्याची २८ वर्षीय प्रेयसी बेशुद्ध पडल्याची माहिती दिली. पॅरामेडिक्स जेव्हा त्यांच्या बेसमेंटमधील अपार्टमेंटमध्ये पोहोचले, तेव्हा इम जॅन डी (Im Jan Di - टोपणनाव) या पीडितेचा आधीच कार्डियाक अरेस्टने मृत्यू झाला होता.

घटनास्थळी पोलीस उपस्थित होते. जिओनने आपणच तिला मारहाण केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याने रबर मॅलेटचा (हातोडा) वापर करून तिला अनेक वेळा मारल्याचं सांगितलं. तिला मारण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता, पण तिच्या 'खोटेपणामुळे' आपल्याला राग आल्याचा दावा त्याने केला.

शवविच्छेदनात इमच्या २१ बरगड्या मोडल्याचं आणि शरीरातील अनेक अवयव फाटल्याचं निष्पन्न झालं. घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली होती. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी याला 'अमानुष छळ' (torture) म्हटलं आहे.

प्रॉडक्शन टीमने इमच्या फोनची तपासणी केली. तेव्हा हे जोडपं एका विचित्र प्रोजेक्टवर काम करत असल्याचं समोर आलं. त्यांच्यात 'गुक्पेउ' (gukpeu) हा शब्द वारंवार वापरला गेला होता. हा 'गुक्गा पेउरोजेक्टेउ' (राष्ट्रीय प्रकल्प) या शब्दाचा शॉर्ट फॉर्म होता. जिओनने टीमला सांगितलं की, त्यांनी 'ड्युरी किंगडम' (Dduri Kingdom) नावाचा एक काल्पनिक देश तयार केला होता.

या देशासाठी त्यांनी काही नियम बनवले होते, जेणेकरून त्यांच्यात कमी भांडणं होतील. यात "ज्या क्षणी तू खोटं बोलशील, तेव्हा तुला कोणतीही माणुसकीची वागणूक मिळणार नाही" आणि "एकदा शिक्षा सुरू झाली की, कोणतीही विनंती किंवा स्पष्टीकरण ऐकलं जाणार नाही" अशा नियमांचा समावेश होता. "शिक्षा तुझ्या कल्पनेपलीकडची असेल," असंही त्यात नमूद होतं. फक्त जिओनलाच शिक्षा देण्याचा अधिकार होता.

जिओनच्या कोड्यांसारख्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी इमने अनेकदा एआयचा (AI) वापर केल्याचे पुरावेही तिच्या फोनमध्ये सापडले.

इमच्या सहकाऱ्यांच्या मते, ती एक दयाळू आणि कष्टाळू मुलगी होती. पण वर्षभरापूर्वी तिच्या वागण्यात खूप बदल झाला होता. ती फोनवर बोलण्यासाठी इमर्जन्सी पायऱ्यांवर जायची. अनेकदा तिच्या चेहऱ्यावर जखमा असायच्या किंवा ती लंगडत कामावर यायची. पण तिने कधीही कोणाकडे मदत मागितली नाही.

जिओनच्या मित्रांच्या मते, तो हट्टी आणि रागीट स्वभावाचा होता. त्याला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नव्हतं. क्षुल्लक कारणांवरून तो भांडायचा, त्यामुळे त्याच्यासोबत राहणं त्रासदायक असल्याचं त्यांनी नमूद केलं. मात्र, जिओनच्या पालकांनी इमनेच त्याला 'गॅसलाइट' (मानसिक छळ) केल्याचा दावा केला आहे.

आता जिओनने आयुष्यभर इमच्या कुटुंबाला मदत करण्याची आणि त्यांची माफी मागण्याची इच्छा व्यक्त केली आहे.