Nicolas Maduro Pleads Not Guilty In US Court : मी निर्दोष आहे, कोणताही गुन्हा केलेला नाही, मी एक सज्जन व्यक्ती आहे आणि मी अजूनही व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष आहे, असे ६३ वर्षीय निकोलस मादुरो यांनी कोर्टात दुभाष्यामार्फत स्पष्ट केले.
Nicolas Maduro Pleads Not Guilty In US Court : अमेरिकेने लष्करी कारवाईद्वारे ताब्यात घेतलेले व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेतील कोर्टात हजर करण्यात आले. निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सीलिया फ्लोरेस यांना न्यूयॉर्कमधील कोर्टात हजर करण्यात आले. आपण अजूनही व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष आहोत, असे मादुरो यांनी कोर्टाला सांगितले. मादुरो यांच्यावर अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, असे मादुरो यांनी सोमवारी कोर्टाला सांगितले.
मादुरो आणि त्यांची पत्नी न्यूयॉर्कमधील कोर्टात पहिल्यांदाच हजर झाले. मी निर्दोष आहे, कोणताही गुन्हा केलेला नाही, मी एक सज्जन व्यक्ती आहे आणि मी अजूनही व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष आहे, असे ६३ वर्षीय निकोलस मादुरो यांनी कोर्टात दुभाष्यामार्फत स्पष्ट केले. दोघांनाही मॅनहॅटनच्या फेडरल कोर्टात हजर करण्यात आले. १७ मार्च रोजी दोघांना पुन्हा कोर्टात हजर केले जाईल. मादुरो यांच्या बाजूने आणि विरोधात घोषणाबाजी करत अनेक लोक कोर्टाच्या परिसरात जमले होते.
मादुरो यांना पाठिंबा दर्शवत, उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता. मात्र, अमेरिकेच्या या कारवाईविरोधात काय करणार हे डेल्सी यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. ड्रग कार्टेलसोबत मिळून कोकेनची तस्करी केल्याचा मादुरो यांच्यावरील मुख्य आरोप आहे.
मेक्सिकोचे सिनालोआ कार्टेल, सेटास कार्टेल, कोलंबियन FARC बंडखोर आणि व्हेनेझुएलातील ट्रेन डे अरागुआ गँग यांच्यासोबत मादुरो यांनी कोकेन तस्करीला मदत केल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. मादुरो यांच्यावर प्रामुख्याने चार गुन्हे दाखल आहेत. नार्को-टेररिझम, कोकेन तस्करीचा कट, मशीन गन बाळगणे आणि प्राणघातक शस्त्रे बाळगणे हे मादुरो यांच्यावरील आरोप आहेत. स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ वाजता मॅनहॅटन कोर्टात मादुरो यांच्यावरील खटल्याची सुनावणी सुरू झाली. मादुरो यांना कैद्यांच्या वेशात कोर्टात आणण्यात आले होते. मादुरो स्पॅनिश भाषेत बोलत होते.


