Nepal Plane Crash : एका झटक्यात कुटुंब संपले, क्रू मेंबरसह पत्नी, मुलगा ठार

| Published : Jul 24 2024, 05:09 PM IST / Updated: Jul 24 2024, 05:16 PM IST

Nepal Plane Crash family died

सार

Nepal Plane Crash: विमान कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अपघातग्रस्त विमानात फ्लाइट मेंटेनन्स कर्मचारी मनुराज शर्मा पत्नी प्रिजा खतिवडा, चार वर्षांचा मुलगा अधिराज शर्मा यांच्यासह प्रवास करत होते. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला आहे.

 

Nepal Plane Crash : नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सकाळी झालेल्या विमान अपघातात 18 जणांना आपला जीव गमवावा लागला. काठमांडूहून पोखरा येथे 19 प्रवाशांना घेऊन निघालेल्या सूर्या एअरलाइन्सच्या विमानाला उड्डाणानंतर लगेचच अपघात झाला. या अपघाताचे व्हिडिओही समोर आले आहेत. या विमानात एकूण 19 जण होते, त्यापैकी केवळ एका पायलटला वाचवता आले. आता या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू

एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, अपघातग्रस्त विमानात फ्लाइट मेंटेनन्स कर्मचारी मनुराज शर्मा पत्नी प्रिजा खतिवडा आणि चार वर्षांचा मुलगा अधिराज शर्मा यांच्यासह प्रवास करत होते. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला आहे. निवेदनानुसार, प्रिजा ही देखील सरकारी कर्मचारी होती आणि ऊर्जा मंत्रालयात असिस्टंट कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होती. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 17 जण सूर्या एअरलाइन्सचे कर्मचारी होते.

एका पायलटचा वाचला जीव

या अपघातात 37 वर्षीय कॅप्टन एमआर शाक्य यांचे प्राण वाचले असून त्यांना अपघातस्थळावरून वाचवण्यात आले आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे विमान Bombardier CRJ-200ER होते जे 2003 मध्ये तयार करण्यात आले होते. हे विमान दुरुस्तीसाठी नेले जात होते. विमान पोखराला जात होते, जेणेकरून दुरुस्तीनंतर त्याची तांत्रिक तपासणी करता येईल, असे एअरलाइन्सने म्हटले आहे. विमानाने रनवे 2 वरून उड्डाण केले आणि रनवे 20 वर अपघात झाला.

नेपाळमध्ये इतके विमान अपघात का होतात?

नेपाळमध्ये विमान अपघाताची ही काही नवीन घटना नाही. या देशात विमान अपघाताच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. नेपाळमध्ये डोंगराळ प्रदेश, हवामान, नवीन विमाने आणि पायाभूत सुविधांचा अभाव तसेच जुन्या विमानांचा दीर्घकाळ वापर यामुळे असे अपघात घडत असल्याचे विविध अहवाल सांगतात. अहवालानुसार, नेपाळमध्ये गेल्या 30 वर्षांत जवळपास 28 विमान अपघात झाले आहेत. याआधी 2023 च्या सुरुवातीला विमान अपघातात 68 जणांचा मृत्यू झाला होता.

आणखी वाचा :

Nepal Plane Crash : नेपाळमधील त्रिभुवन विमानतळावर विमान कोसळले, 18 जणांचा मृत्यू

जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट 2024 ची यादी जाहीर, भारताचा कितवा क्रमांक?

धक्क्यानंतर विमान जमिनीवर आदळले, नेपाळ विमान अपघाताचा Video Viral