NASA : अवकाशात अनेक किलोमीटर लांबपर्यंत पसरलेली एक जांभळ्या रंगाची वीज दिसली. नासाचे अंतराळवीर डॉन पेटिट यांनी या अनोख्या विजेचा शूट केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
(NASA) कॅलिफोर्निया : अनेकदा निसर्गाच्या काही चमत्कृती पाहून अवाक् व्हायला होते. एखाद्या दिवशी संधीकाळात नुसते आकाशाकडे पाहिले तरी, विविध रंगांची उधळण पाहायला मिळते. ब्रह्मांडात तर अशा कितीतरी अनोख्या गोष्टी घडत असतील. ज्या आपल्या नजरेच्या पलीकडे आहेत. अशीच एक आपल्या नजरेच्या पलीकडे असलेली घटना व्हिडीओद्वारे व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावरील व्हिडीओची खातरजमा करावी लागते. पण हा व्हिडीओ मात्र खराखुरा आहे.
आपण विविध आकारांच्या आणि रूपांच्या विजा पाहिल्या असतील, पण असे दृश्य पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. नासाचे प्रसिद्ध अंतराळवीर डॉन पेटिट यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून (ISS) पृथ्वीच्या अगदी वर जांभळ्या रंगात चमकणाऱ्या एका विशाल विजेचा व्हिडीओ शेअर केला आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील आणखी एक अविश्वसनीय दृश्य
ISS मधून डॉन पेटिट यांनी शेअर केलेला विजेचा व्हिडीओ मनमोहक आहे. हे दृश्य एका वादळावेळी पृथ्वीवरील विशाल ढगांच्या समुहामध्ये झालेल्या विजेचे आहे. या विजेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ती जांभळ्या रंगाची दिसते. ही अविश्वसनीय वीज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या अगदी खाली (Nadir ISS) दिसली. अनेक किलोमीटर पसरणारी ही विशाल वीज जेलीफिशसारखी सुंदर दिसते.
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, वीज चमकताना मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह गेल्यास हवा चमकते, त्यामुळे जांभळा रंग दिसतो. दाट ढगांमुळे दृश्यमानता कमी होत असल्याने असे रंग जमिनीवरून सहसा दिसत नाहीत. तथापि, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ४०० किलोमीटर उंचीवर फिरणाऱ्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून डॉन पेटिट यांच्यासारख्या अंतराळवीरांना वादळांवर अशा आकर्षक रंगांच्या विजा पाहता येतात.
डॉन पेटिट यांनी शेअर केलेला विजेचा व्हिडीओ व्हायरल
डॉन पेटिट हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पृथ्वी आणि विश्वाची अनेक अविश्वसनीय दृश्ये कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ISS वरील आपली चौथी मोहीम पूर्ण करून ते एप्रिल २०२५ मध्ये पृथ्वीवर परतले होते. याच चौथ्या मोहिमेदरम्यान पेटिट यांनी हा विजेचा व्हिडिओ शूट केला. असा अंदाज आहे की, डॉन पेटिट यांनी हे किलोमीटरपर्यंत पसरलेले विजेचे दृश्य एका मोठ्या उष्णकटिबंधीय वादळाच्या वरून टिपले असावे. भविष्यात चक्रीवादळांच्या वेळी अंतराळ स्थानकातून निरीक्षण करणाऱ्या अंतराळवीरांना कदाचित याहूनही अधिक आकर्षक दृश्ये टिपता येतील.


