NASA ने इंटरस्टेलर धुमकेतू 3I/ATLAS चा वेग 209,000 किमी/प्रति तास नोंदवण्यात आला आहे. हबल टेलिस्कोपने याचा स्पष्ट फोटो देखील घेतला असून हा रहस्यमय गोळा पृथ्वीसाठी धोकादायक नाही.
मुंबई : विश्वाच्या अथांग अंधाऱ्या खोऱ्यातून आलेला 3I/ATLAS नावाचा धूमकेतू सध्या शास्त्रज्ञांसाठी एक मोठं गूढ आहे. हा साधा धूमकेतू नाही, तर आपल्या सौरमालेबाहेरील एक आंतरतारकीय धूमकेतू आहे. नासाच्या हबल स्पेस टेलिस्कोपने त्याचे सर्वात स्पष्ट चित्र घेतले असून त्यातून धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. हा धूमकेतू तब्बल २,०९,००० किलोमीटर प्रति तास या वेगाने अवकाशातून धावत आहे. आजवर कोणत्याही धूमकेतूचा इतका प्रचंड वेग नोंदवलेला नाही. नासाच्या मते, हा एक असा वैश्विक राक्षस आहे जो अब्जावधी वर्षांपासून अवकाशात भटकत आहे.
उगम अद्याप गूढच
या संशोधनाचे प्रमुख शास्त्रज्ञ डेव्हिड ज्युविट म्हणतात, “जणू कोणीतरी रायफलची गोळी एका क्षणभरासाठी पाहिली आहे, पण ती कुठून सुटली हे समजत नाही.” म्हणजेच, हा धूमकेतू कोणत्या सौरमालेतून किंवा तारकासमूहातून बाहेर पडला, हे आजही अज्ञात आहे.
नासाची बहुआयामी निरीक्षण मोहीम
नासाने या धूमकेतूवर केवळ हबल नव्हे तर जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप, TESS, स्विफ्ट ऑब्झर्व्हेटरी आणि W\.M. केक ऑब्झर्व्हेटरी यांच्या मदतीने लक्ष ठेवले आहे. यामुळे त्याची रचना, रासायनिक संरचना आणि संभाव्य उगम याविषयी अधिक तपशील मिळत आहेत.
हबलच्या निरीक्षणांतील खास बाबी
हबलच्या छायाचित्रांनुसार, या धूमकेतूचा गाभा बर्फ आणि दगडांपासून बनलेला आहे. त्याचा आकार साधारण ५.६ किमी असल्याचा अंदाज आहे. धूमकेतूच्या गाभ्यातून धूळ आणि वायूंचा जाड थर बाहेर पडताना दिसतो. सूर्याच्या उष्णतेमुळे त्याचा पृष्ठभाग वितळतो आणि त्यामुळे एक चमकदार शेपटी तयार होते.
आंतरतारकीय धूमकेतूंचा परिचय
आंतरतारकीय धूमकेतू म्हणजे दुसऱ्या सौरमालेतून आपल्या सूर्यमालेत येणारे धूमकेतू. 3I/ATLAS हा अशा प्रकारचा आतापर्यंत शोधलेला तिसरा आंतरतारकीय प्रवासी आहे. याआधी ओमुआमुआ (२०१७) आणि बोरिसोव्ह (२०१९) हे दोन धूमकेतू आढळले होते. मात्र, 3I/ATLAS चा विलक्षण वेग आणि त्याचे स्थान यामुळे तो विशेष ठरतो.
पृथ्वीला धोका नाही, पण अभ्यास महत्त्वाचा
नासाच्या मते, ३I/ATLAS मुळे पृथ्वीला कोणताही धोका नाही. मात्र, अशा अवकाशातील प्रवाशांचा अभ्यास केल्याने भविष्यात येणाऱ्या संभाव्य अंतराळधोक्यांविषयी माहिती मिळेल. त्याचबरोबर, इतर सौरमालेतील कार्यपद्धती व रचना यांचा अंदाज घेणे सोपे होईल.


