Iran Confirms killing of Top Security Chief : इराणच्या सर्वोच्च सुरक्षा परिषदेचे प्रमुख अली लारीजानी आणि बसिज फोर्सचे कमांडर गुलाम रझा सुलेमानी मारले गेल्याचं इराणने अधिकृतपणे जाहीर केलं आहे. 

Iran Confirms killing of Top Security Chief : इराणचे सर्वोच्च सुरक्षा परिषदेचे प्रमुख अली लारीजानी यांची हत्या झाल्याच्या वृत्ताला आता खुद्द इराणनेच दुजोरा दिला आहे. खामेनी यांच्यानंतर लारीजानी हे इराणमधील सर्वात मोठे राजकीय नेते मानले जात होते. त्यांच्यासोबत इराणच्या बसिज फोर्सचे कमांडर गुलाम रझा सुलेमानी हेही मारले गेले आहेत. या हल्ल्याचा बदला घेतला जाईल, असा थेट इशारा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सने (IRGC) दिला आहे. इस्रायलने पहाटे केलेल्या हल्ल्यांमध्ये लारीजानी हेच मुख्य लक्ष्य होते आणि ते मारले गेले, असं वृत्त इस्रायली माध्यमांनी दिलं होतं. त्यानंतर काही तासांनी इराणने ही बातमी कन्फर्म केली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

इराणची वृत्तसंस्था 'मेहर'ने सुरक्षा परिषदेच्या हवाल्याने म्हटलं आहे की, 'इराणच्या विकासासाठी आणि इस्लामिक क्रांतीसाठी आयुष्यभर झटल्यानंतर, अखेर त्यांची इच्छा पूर्ण झाली. ते अभिमानाने शहीद झाले.' लारीजानी हे इराणच्या लष्करी नेतृत्वातील एक अत्यंत महत्त्वाचे नेते होते. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या हत्येनंतर देशाच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी लारीजानी यांच्या खांद्यावर होती. त्यामुळे थेट सुरक्षा प्रमुखांना लक्ष्य करणारा हा हल्ला इराणसाठी खूप मोठा धक्का आहे. इस्रायली लष्कराने दावा केला आहे की, त्यांनी तेहरान, शिराझ आणि तब्रिझ शहरांमधील मिसाइल बनवण्याच्या केंद्रांवर आणि लष्करी तळांवर एकाच वेळी हवाई हल्ले केले.

कोण होते अली लारीजानी?

लारीजानी यांचा जन्म १९५८ मध्ये इराकमधील नजफ शहरात झाला. शाहच्या राजवटीतील अत्याचारांपासून वाचण्यासाठी त्यांचं कुटुंब १९३० च्या दशकात इराकमध्ये स्थायिक झालं होतं. लारीजानींच्या जन्मानंतर दोन वर्षांनी त्यांचं कुटुंब पुन्हा इराणला परतलं. त्यांनी खोम शहरातील मदरशात प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर तेहरानच्या आर्यमेहर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमधून गणितात पदवी मिळवली. पुढे कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. पण त्यानंतर त्यांनी पाश्चात्य तत्त्वज्ञानात रस घेतला आणि त्यात पीएचडी केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्समध्ये (IRGC) सामील झाले आणि तिथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. ते तीन वेळा संसदेचे अध्यक्ष (स्पीकर) आणि सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख राहिले.

राजकीय प्रवास

१९७९ च्या इस्लामिक क्रांतीतून लारीजानी राजकारणात आले. त्यांची सुरुवात रिव्होल्युशनरी गार्ड्समधून झाली. १९८९ मध्ये ते सांस्कृतिक आणि इस्लामिक मार्गदर्शन मंत्री बनले. १९९४ मध्ये ते सरकारी मीडिया विंग IRIB चे महासंचालक झाले. याच काळात ते सर्वोच्च नेते खामेनी यांच्या अधिक जवळ आले. २००५ मध्ये अध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांनी लारीजानी यांची सुरक्षा परिषदेचे प्रमुख आणि अणुकार्यक्रमाचे मुख्य मध्यस्थ म्हणून नियुक्ती केली. पण दोनच वर्षांत अध्यक्ष अहमदीनेजाद यांच्या कट्टरतावादी धोरणांना कंटाळून त्यांनी राजीनामा दिला. २००८ मध्ये ते खासदार म्हणून निवडून आले आणि २०२० पर्यंत तीन वेळा स्पीकर झाले. २००५ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवली, पण त्यांना फक्त ५.९४% मतं मिळाली आणि ते सहाव्या स्थानी राहिले. २०२१ आणि २०२४ मध्येही त्यांनी अर्ज दाखल केला होता, पण खामेनी यांनी तो फेटाळला. यानंतर ते मुख्य प्रवाहातून थोडे बाजूला झाले होते, पण २०२४ मध्ये मसूद पेझेश्कियान यांनी त्यांची पुन्हा सुरक्षा परिषदेचे सचिव म्हणून नियुक्ती केली.

एप्रिल २०२५ मध्ये जेव्हा इराण-इस्रायल तणाव वाढला, तेव्हा लारीजानी यांनी एक धमकीवजा इशारा दिला होता. 'जर हल्ला झाला, तर इराणला अण्वस्त्र बनवावं लागेल,' असं ते म्हणाले होते. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर दोन महिन्यांनी जूनमध्ये इस्रायलने इराणवर हल्ला केला. याच वर्षी ट्रम्प यांनी अणुचर्चेचा प्रस्ताव ठेवल्यावर लारीजानी यांनी चर्चेला पाठिंबा दिला होता. तीन वेळा चर्चा झाली, पण करार होऊ शकला नाही. खामेनी यांच्या हत्येनंतर इस्रायलला प्रत्युत्तर देण्याच्या मोहिमेचं नेतृत्व लारीजानीच करत होते.