Middle East Tensions Escalate to Water War : मध्य पूर्वेतील संघर्ष आता 'पाण्यासाठी युद्ध' या नव्या वळणावर आला आहे. इराण आणि अमेरिकेने एकमेकांच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ले केले आहेत. दरम्यान, सौदी अरेबियात झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

Middle East Tensions Escalate to Water War : लष्करी तळ, दूतावास, तेल डेपो आणि सरकारी कार्यालयांवर हल्ले झाल्यानंतर आता मध्य पूर्वेतील संघर्ष 'पाण्यासाठीच्या युद्धा'त बदलला आहे. या भागात पेट्रोलपेक्षाही जास्त किंमत असलेल्या पाण्याच्या प्रकल्पांवर इराण आणि अमेरिका एकमेकांवर हल्ले करत असल्याने मोठी चिंता निर्माण झाली आहे.

रविवारी इराणने बहरीनमधील एका पाणी शुद्धीकरण प्रकल्पाला लक्ष्य करून हल्ला केला. तर दुसरीकडे, अमेरिकेने खेशम बेटावरील आमच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला केल्याचा आरोप इराणने केला आहे. वाळवंटी प्रदेशात समुद्राचं पाणी खास प्रकल्पांमधून शुद्ध करून लोकांना आणि उद्योगांना पुरवलं जातं. पण आता थेट याच प्रकल्पांवर हल्ले होत असल्याने लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या हक्कावरच गदा आली आहे.

इस्रायलला अमेरिकेकडून 20,000 बॉम्ब

वॉशिंग्टन: इराणसोबतचा संघर्ष ३ महिने चालेल, असं म्हणणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आपल्या अधिकाऱ्यांना इस्रायलसाठी ६००० कोटी रुपये किमतीचे २०,००० बॉम्ब पाठवण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेच्या शस्त्र निर्यात नियंत्रण कायद्यानुसार, परदेशात शस्त्रं विकण्यासाठी संसदेची परवानगी आवश्यक असते. पण ट्रम्प यांनी संसदेला न कळवताच हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय हिताच्या अनुषंगाने आहे, असं परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी म्हटलं आहे. यामागे इस्रायलच्या भूमीवरून इराणवरील हल्ले आणखी तीव्र करण्याचा अमेरिकेचा डाव असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

इराणच्या हल्ल्यात भारतीय ठार

रियाध: सौदी अरेबियावर रविवारी झालेल्या हल्ल्यात एका भारतीयासह एकूण १४ जण ठार झाल्याची माहिती सौदी सरकारने दिली आहे. मृतांमध्ये एक भारतीय आणि १३ बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. राजधानी रियाधपासून ८० किलोमीटर दूर असलेल्या अल खर्ज भागातील एका रहिवासी वस्तीवर हा हल्ला झाला. या घटनेमुळे मध्य पूर्व संघर्षात बळी पडलेल्या भारतीयांची संख्या आता ४ झाली आहे. याआधी होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इराणने एका तेलवाहू जहाजावर केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय खलाशी मारले गेले होते.

हल्ल्याचे फोटो काढू नका, UAE चा भारतीयांना सल्ला

अबूधाबी: मध्य पूर्वेतील युद्धाचे फोटो किंवा व्हिडिओ काढू नका आणि ते सोशल मीडियावर टाकू नका, अशी सूचना UAE मधील भारतीय दूतावासाने तेथील भारतीयांना दिली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. 'संशयास्पद वस्तू दिसल्यास अधिकाऱ्यांना माहिती द्या, अशा ठिकाणांपासून दूर राहा. फोटो काढण्यासाठी कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडू नका,' असंही दूतावासाने स्पष्ट केलं आहे.