प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी हंटर बायडेन यांच्यावर $1 अब्जपेक्षा जास्त रकमेचा दावा दाखल करण्याची धमकी दिली आहे. बायडेन यांनी दावा केला होता की त्यांच्या पतीची ओळख लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनने करून दिली होती.
प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी हंटर बायडेन यांच्यावर $1 अब्जपेक्षा जास्त रकमेचा दावा दाखल करण्याची धमकी दिली आहे. बायडेन यांनी दावा केला होता की, त्यांच्या पतीची ओळख लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनने करून दिली होती. २००५ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी विवाह केलेल्या मेलानिया यांच्या वतीने काम करणाऱ्या वकिलांनी हा दावा "खोटा, अपमानजनक, बदनामीकारक आणि भडकवणारा" असल्याचे म्हटले आहे.
माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे पुत्र हंटर बायडेन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला एका मुलाखतीत हे वक्तव्य केले. यात त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे एपस्टीनशी असलेल्या पूर्वीच्या संबंधांवर जोरदार टीका केली होती. डोनाल्ड ट्रम्प हे एपस्टीनचे मित्र होते, परंतु ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील गोल्फ क्लबमधील स्पा कर्मचाऱ्यांना एपस्टीनने कामावर घेतल्यामुळे २००० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांच्यात दुरावा निर्माण झाला, असे ट्रम्प यांनी सांगितले आहे.
प्रथम महिलेच्या वकिलांनी हंटर बायडेन यांच्या वकिलांना एक पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी हा दावा मागे घेण्याची आणि माफी मागण्याची मागणी केली आहे, अन्यथा "$1 अब्जपेक्षा जास्त नुकसानभरपाईसाठी" कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे म्हटले आहे. त्या पत्रात असे नमूद केले आहे की, हंटर बायडेन यांनी केलेल्या या दाव्यामुळे प्रथम महिलेला "अफाट आर्थिक आणि प्रतिष्ठेचे नुकसान" झाले आहे.
पत्रात हंटर बायडेन यांच्यावर "इतरांच्या नावाचा वापर करून फायदा मिळवण्याचा मोठा इतिहास" असल्याचा आणि "स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी" हा दावा पुन्हा केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला चित्रपट निर्माते अँड्र्यू कॅलाघन यांच्यासोबतच्या एका विस्तृत मुलाखतीत, हंटर बायडेन यांनी दावा केला होता की एपस्टीनशी संबंधित अप्रकाशित कागदपत्रे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना "अडकवू शकतात".
ते म्हणाले होते, "एपस्टीननेच मेलानियाची ओळख ट्रम्पशी करून दिली होती. त्यांचे संबंध इतके व्यापक आणि खोल आहेत." प्रथम महिलेच्या कायदेशीर पत्रात म्हटले आहे की, हा दावा अंशतः मायकेल वुल्फ या पत्रकारावर आधारित होता, ज्यांनी राष्ट्राध्यक्षांचे टीकात्मक चरित्र लिहिले आहे.
अलीकडे, अमेरिकेतील 'द डेली बीस्ट' या वृत्तसंस्थेशी बोलताना वुल्फ यांनी दावा केला होता की, मेलानिया ट्रम्प त्यांच्या पतीला भेटल्या तेव्हा त्या एपस्टीन आणि ट्रम्प यांच्या एका सहकाऱ्याला ओळखत होत्या. मात्र, प्रथम महिलेच्या वकिलांकडून एक पत्र मिळाल्यानंतर, ज्यात कथेच्या मथळ्याला आणि मांडणीला आव्हान देण्यात आले होते, वृत्तसंस्थेने ती बातमी मागे घेतली.
एपस्टीनने २०१९ मध्ये तुरुंगात असताना आत्महत्त्या केली होती. एपस्टीनने या दोघांची ओळख करून दिल्याचा कोणताही पुरावा नाही. प्रथम महिलेच्या कायदेशीर पत्रात, हंटर बायडेन यांच्यावर एका आता मागे घेतलेल्या लेखावर आधारित दावा केल्याचा आरोप आहे, ज्याचे वर्णन "खोटा आणि बदनामीकारक" असे करण्यात आले आहे.
'द डेली बीस्ट'च्या ऑनलाइन स्टोरीच्या संग्रहित आवृत्तीवर एक संदेश आहे: "ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर, द बीस्टला प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांच्या वकिलांचे पत्र मिळाले, ज्यात लेखाच्या मथळ्याला आणि मांडणीला आव्हान देण्यात आले होते." "या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर, द बीस्टने हा लेख काढून टाकला आहे आणि कोणत्याही गोंधळ किंवा गैरसमजाबद्दल माफी मागतो."
कायदेशीर धमकीबद्दल विचारले असता, प्रथम महिलेचे वकील अलेजांद्रो ब्रितो यांनी बीबीसी न्यूजला त्यांच्या सहाय्यक निक क्लेमेन्स यांनी जारी केलेल्या निवेदनाचा संदर्भ दिला. त्या निवेदनात असे म्हटले आहे: "प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांचे वकील दुर्भावनापूर्ण, बदनामीकारक खोटेपणा पसरवणाऱ्यांकडून त्वरित माफी आणि खुलासे मिळवण्याची खात्री करत आहेत."
'हार्पर बाजार'ने जानेवारी २०१६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका लेखानुसार, मेलानिया ट्रम्प नोव्हेंबर १९९८ मध्ये एका मॉडेलिंग एजन्सीच्या संस्थापकाने आयोजित केलेल्या पार्टीत त्यांच्या पतीला भेटल्या. ५५ वर्षीय मेलानिया ट्रम्प यांनी त्या प्रकाशनाला सांगितले की, त्यांनी ट्रम्प यांना फोन नंबर देण्यास नकार दिला होता कारण ते "एका मैत्रिणीसोबत आले होते".
ट्रम्प नुकतेच त्यांची दुसरी पत्नी, मार्ला मॅपल्स, यांच्यापासून वेगळे झाले होते, ज्यांना त्यांनी १९९९ मध्ये घटस्फोट दिला होता. यापूर्वी त्यांचे १९७७ ते १९९० दरम्यान इव्हाना ट्रम्प यांच्याशी लग्न झाले होते. बीबीसीने हंटर बायडेन यांच्या वकिलांशी संपर्क साधला आहे. हे कायदेशीर पत्र तथाकथित 'एपस्टीन फाइल्स' (एपस्टीनशी संबंधित अप्रकाशित कागदपत्रे) जारी करण्याच्या व्हाइट हाऊसवरील अनेक आठवड्यांच्या दबावानंतर आले आहे.
पुन्हा निवडून येण्यापूर्वी, ट्रम्प यांनी सत्तेत परतल्यास ते हे रेकॉर्ड्स जारी करतील असे म्हटले होते, परंतु एफबीआय आणि न्याय विभागाने जुलैमध्ये सांगितले की एपस्टीनच्या साथीदारांची कोणतीही "गुन्हेगारी" क्लायंट यादी अस्तित्वात नाही.


