जर्मनीतील डॉर्टमुंडमध्ये एका फास्ट फूड रेस्टॉरंटने १ युरोमध्ये कबाब देण्याची ऑफर दिली होती. यामुळे दुकानाबाहेर मोठी गर्दी उसळली. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले, त्यानंतर हेलिकॉप्टरही बोलवावे लागले. जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर अनेक जणांना अटक करण्यात आली आहे.
एका फास्ट फूड रेस्टॉरंटच्या उद्घाटनाच्या निमित्ताने १ युरोमध्ये कबाब देण्याच्या ऑफरमुळे लोकांची मोठी झुंबड उडाली. जर्मन शहर डॉर्टमुंडमध्ये ही गर्दी इतकी वाढली की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. जमावाला पांगवण्यासाठी जवळपास १०० पोलीस कर्मचारी आणि हेलिकॉप्टर शहरात तैनात करण्यात आल्याचे वृत्त आहे.
फक्त १ युरोमध्ये कबाब!
नव्याने सुरू झालेल्या फास्ट फूड रेस्टॉरंटच्या प्रमोशनसाठी मालकाने ही खास ऑफर जाहीर केली होती. सामान्यतः ७.५० ते ९ युरोमध्ये मिळणारा कबाब फक्त १ युरोमध्ये विकला जाईल, असे वचन दिले होते. ऑफरची माहिती मिळताच लहान मुलांसह मोठ्यांची मोठी गर्दी दुकानासमोर जमल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली.
सुरुवातीला परिस्थिती शांत करण्यासाठी दुकान मालकाने खाजगी सुरक्षा रक्षकांना नियुक्त केले होते, परंतु ते गर्दी नियंत्रित करू शकले नाहीत. त्यानंतर मालकाने पोलिसांची मदत घेतली. पोलिसांच्या अंदाजानुसार दुकानाबाहेर सुमारे ३०० लोक जमा झाले होते, तर मालकाच्या दाव्यानुसार १,००० हून अधिक लोक आले होते.
अखेर हेलिकॉप्टर बोलावले
जमावातील काहींनी पोलिसांवर दगड, बाटल्या आणि फटाके फेकण्यास सुरुवात केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. परिस्थिती बिघडल्याने पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी पोहोचली आणि निगराणीसाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले.
याप्रकरणी पोलिसांनी अनेक जणांना अटक केली आहे. एकाकडून गोळ्या नसलेले बंदूक जप्त केल्याचेही वृत्त आहे. त्यांच्यावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, शांतता भंग करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, पुरेशी सुरक्षा न ठेवता ऑफर जाहीर करून गोंधळ निर्माण करणाऱ्या दुकान मालकावर कायदेशीर कारवाई करणार का, याबाबत पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.












