फ्लोरिडामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. अभयारण्यात पाणी भरल्याने एका ठिकाणी अडकलेल्या चिम्पान्झींना कर्मचाऱ्यांनी चक्क ड्रोनच्या मदतीने अन्न आणि ब्लँकेट्स पोहोचवले.
फ्लोरिडामधील काही भागांत मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. फोर्ट पियर्स येथील 'सेव्ह द चिम्प्स' (Save the Chimps) अभयारण्यातही पाणी भरले. या पाण्यात अडकलेल्या चिम्पान्झींची काळजी घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी एक भन्नाट शक्कल लढवली. त्यांनी एका ड्रोनच्या मदतीने या अडकलेल्या प्राण्यांना अन्न आणि ब्लँकेट्स पोहोचवले.
एका व्हिडिओत 'कालेब' नावाचा चिम्पान्झी ड्रोनने टाकलेल्या कागदी पिशवीतील केळी मजेत खाताना दिसत आहे. दुसऱ्या क्लिपमध्ये, एक चिम्पान्झी ड्रोनने दिलेल्या ब्लँकेटवर आरामात झोपला आहे आणि दुसरा त्याच्या कानातील कीटक काढत आहे.
अभयारण्याची तब्बल १५० एकर जागा पावसामुळे पाण्याखाली गेली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना प्राण्यांपर्यंत पोहोचणे खूप कठीण झाले होते. इमर्जन्सी व्यवस्था असली तरीही, गोल्फ कार्ट्स किंवा इतर गाड्या या पुराच्या पाण्यातून जाऊ शकत नव्हत्या.
पुराचे पाणी ओसरण्याची वाट पाहण्याऐवजी, कर्मचाऱ्यांनी प्राण्यांना जेवण आणि आवश्यक वस्तू देण्यासाठी एक नवीन मार्ग शोधला. त्यांनी वाचवलेल्या या चिम्पान्झींपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर केला.
या व्हायरल व्हिडिओसोबत केलेल्या पोस्टमध्ये, 'सेव्ह द चिम्प्स'ने सांगितले की येथील सर्व प्राणी सुरक्षित आहेत. पण, पुरामुळे झालेल्या नुकसानीची दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
"आमचे प्राणी सुरक्षित आहेत, पण अभयारण्याला तुमच्या मदतीची गरज आहे. पुरामुळे रस्ते खराब झाले आहेत, त्यामुळे मोठे काम करावे लागणार आहे. छताची दुरुस्ती आणि बुरशी काढण्याचे कामही गरजेचे आहे. गोल्फ कार्ट्स, फोर-व्हील ड्राइव्ह वाहने आणि कुलरचे कॉम्प्रेसर यांसारख्या उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे," असे त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
अभयारण्याच्या सीईओ अना पॉला टावरेस यांनी न्यूयॉर्क पोस्टला सांगितले की, चिम्पान्झी सुरक्षित असल्याचा दिलासा असला तरी कर्मचाऱ्यांसाठी पुरामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
"चिम्पान्झी उंचावर असलेल्या बेटांवर सुरक्षित आहेत. पण संपूर्ण परिसरात पाणी साचल्यामुळे कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचणे आणि त्यांची रोजची कामे करणे खूप कठीण झाले आहे," असे टावरेस म्हणाल्या.












