Major agitation in Iran against Govt : अमेरिकेतील ह्यूमन राइट्स ॲक्टिव्हिस्ट्स न्यूज एजन्सीने (HRANA) ही धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर इराणी नागरिक ठार झाल्याचे सांगितले आहे.
Major agitation in Iran against Govt : इराणमध्ये सरकारविरोधात सुरू असलेल्या जनआंदोलनांना दडपण्याच्या सरकारच्या प्रयत्नांत आतापर्यंत ५३८ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेतील ह्यूमन राइट्स ॲक्टिव्हिस्ट्स न्यूज एजन्सीने (HRANA) ही धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे. दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात दहा हजारांहून अधिक लोकांना सरकारने तुरुंगात टाकल्याचा दावा मानवाधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे.
आकडेवारी समोर; सरकारचे मौन
मृत्यू झालेल्यांमध्ये ४९० आंदोलक आणि ४८ इराणी सुरक्षा दलाचे सदस्य असल्याचे अहवालात म्हटले आहे. इराणमध्ये इंटरनेटवर बंदी घातल्यामुळे माहिती बाहेरच्या जगापर्यंत पोहोचण्यास उशीर होत आहे. सरकारने अधिकृतपणे मृतांच्या संख्येला दुजोरा दिला नसला तरी, सुरक्षा दल थेट गोळीबार आणि अश्रुधुराचा वापर करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
अमेरिका लष्करी कारवाईच्या तयारीत?
इराणमधील परिस्थिती बिघडत चालल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प थेट लष्करी कारवाईचा विचार करत असल्याचे CNN ने वृत्त दिले आहे. आंदोलकांविरोधात प्राणघातक बळाचा वापर सुरू ठेवल्यास अमेरिका हस्तक्षेप करेल, असा इशारा ट्रम्प यांनी यापूर्वी दिला होता. सायबर हल्ले किंवा थेट हवाई हल्ल्यांचा विचार व्हाईट हाऊस करत असल्याचेही अहवालात म्हटले आहे. "इराण स्वातंत्र्याच्या प्रतीक्षेत आहे आणि अमेरिका मदतीसाठी तयार आहे," असे ट्रम्प यांनी सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले आहे.


