इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या मृत्यूनंतर कराचीमध्ये मोठा उद्रेक झाला आहे. इराण समर्थक आंदोलकांनी अमेरिकन दूतावासावर हल्ला केला. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात ८ आंदोलक ठार झाले असून, दूतावासातील कर्मचारीही जखमी झाले आहेत.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानच्या कराची शहरात रविवारी वातावरण चांगलंच तापलं. इराण समर्थक आंदोलकांनी अमेरिकेच्या दूतावासावर हल्लाबोल केला. आंदोलकांनी सुरक्षाकडे तोडून आत प्रवेश केला आणि गार्डहाऊसला आग लावली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाकिस्तानी सैन्यासह स्थानिक सुरक्षा दलांनी गोळीबार सुरू केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
प्राथमिक माहितीनुसार, या हिंसाचारात आतापर्यंत आठ आंदोलकांचा मृत्यू झाला आहे, तर अमेरिकन दूतावासातील तीन कर्मचारी जखमी झाले आहेत.
एधी फाऊंडेशन या बचाव संस्थेचे प्रवक्ते मुहम्मद अमीन यांनी सांगितलं, "आम्ही कराचीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किमान आठ मृतदेह हलवले आहेत, तर दूतावासाच्या घटनेत २० जण जखमी झाले आहेत." त्यांनी पुढे सांगितलं की, बहुतेक जणांना गोळ्या लागल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी वाढता तणाव पाहता सुरक्षा दलांना परिसरावर कडक नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
इराणी हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात आंदोलकांचा मोर्चा
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या मोठ्या हल्ल्यानंतर कराचीमध्ये ही निदर्शनं सुरू झाली आहेत. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते, ८६ वर्षीय अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह त्यांचे वरिष्ठ सल्लागार अली शामखानी आणि इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे जनरल मोहम्मद पाकपौर हे ठार झाल्याचं वृत्त आहे.
या हल्ल्यानंतर इराणने मध्य पूर्वेतील अनेक शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. अबू धाबी, दुबई, मनामा आणि तेल अवीवमध्ये स्फोट झाल्याच्या बातम्या आहेत. इराणी सरकारी मीडियाने खामेनी यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, याला इराणच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण म्हटलं आहे.
इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख अली लारीजानी म्हणाले, "इराणचे शूर सैनिक आणि महान राष्ट्र आंतरराष्ट्रीय अत्याचाऱ्यांना कधीही न विसरता येणारा धडा शिकवतील."
खामेनींच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर तेहरानच्या काही भागांमध्ये लोकांनी आनंद साजरा केला, तर दुसरीकडे एंघलाब स्क्वेअरमध्ये जमलेल्या शोकाकुल गर्दीने "अमेरिकेचा मृत्यू होवो" अशा घोषणा दिल्या.
प्रादेशिक पडसाद आणि वाढता तणाव
या हल्ल्यांचे पडसाद इराणच्या बाहेरही उमटले आहेत. UAE मध्ये अबू धाबीत दोन जण ठार झाले, तर दुबईच्या पाम परिसरात चार जण जखमी झाले. इस्रायलमध्ये तेल अवीवजवळ झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून, सुमारे २० जण जखमी झाले आहेत. यानंतर तेहरानने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे, मात्र या निर्णयाची अंमलबजावणी कितपत झाली आहे, हे अद्याप स्पष्ट नाही.
इराण, इराक, कुवेत, सीरिया, UAE आणि इस्रायलमधील हवाई क्षेत्र प्रवासी विमानांसाठी बंद करण्यात आलं आहे. अनेक विमान कंपन्यांनी या भागातील आपली सेवा रद्द केली आहे.
अमेरिका-इस्रायलची अभूतपूर्व कारवाई
इराणमधील अमेरिका-इस्रायलच्या या कारवाईला 'अभूतपूर्व' म्हटलं जात आहे. या प्रदेशातील २७ अमेरिकन तळ आणि इस्रायली लष्करी तळ लक्ष्यांवर होते. इस्रायली लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल इयाल जमीर यांनी म्हटलं आहे की, ही कारवाई गेल्या वर्षीच्या १२ दिवसांच्या जून संघर्षापेक्षा "पूर्णपणे वेगळ्या पातळीवर" होत आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे की, जोपर्यंत तेहरानमध्ये सत्तापालट होत नाही, तोपर्यंत ही मोहीम सुरूच राहील.
ते म्हणाले, "इराणी लोकांना आपला देश परत मिळवण्याची ही सर्वात मोठी संधी आहे." इराणने प्रत्युत्तर दिल्यास आणखी कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणी लोकांना उद्देशून म्हटलं, "एकत्र येऊन, या राजवटीला उलथवून टाकण्याची आणि आपलं भविष्य सुरक्षित करण्याची हीच वेळ आहे."


