जपानच्या ओसाका प्रांतातील इझुमिसानो आणि इझुमिओत्सु शहरात 'दांजिरी' महोत्सवादरम्यान मोठी दुर्घटना घडली. चौकात वळण घेताना ४ टनांचे लाकडी रथ उलटले. या रथांचा तोल सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले आहेत. या भयानक अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, सणांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जपानच्या ओसाका प्रांतात शनिवारी स्थानिक सणादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. इझुमिसानो आणि इझुमिओत्सु या दोन शहरांमध्ये पारंपरिक लाकडी रथ उलटून दोन जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. पोलीस सध्या या दोन्ही घटनांचा तपास करत आहेत. चौकातून वळण घेताना रथाचा तोल गेला. यावेळी रथ सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोन्ही व्यक्तींचा मृत्यू झाला. या अपघाताचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ते पाहून लोकांच्या अंगावर काटा येत आहे. जपान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

हा जीवघेणा अपघात नेमका कसा घडला?

'द जपान टाइम्स'च्या वृत्तानुसार, इझुमिसानो शहरात सकाळी १०.५५ च्या सुमारास एक दांजिरी रथ चौकातून उजवीकडे वळताना अचानक उलटला. या दुर्घटनेत शहरातील एका ५१ वर्षीय कंपनी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. ओसाका प्रांतीय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत इतर सात पुरुष जखमी झाले असून त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे.

दुसरा अपघात इझुमिओत्सु शहरात दुपारी १.२० च्या सुमारास घडला. इथेही चौकातून उजवीकडे वळताना रथ उलटला. यात शेजारच्या इझुमी शहरात राहणाऱ्या एका ४८ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेत इतर नऊ जण जखमी झाले, पण सुदैवाने कोणाचाही जीव धोक्यात नाही.

या दोन्ही घटनांमध्ये बघ्यांपैकी कोणालाही दुखापत झाली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. हे रथ नेमके का उलटले, याचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रशासन आता तपास करत आहे.

दांजिरी महोत्सव म्हणजे काय?

दांजिरी महोत्सव हा जपानमधील एक पारंपरिक सण आहे. यात लाकडापासून बनवलेले मोठे रथ लोक रस्त्यावरून ओढत नेतात. हे रथ साधारण ४ मीटर उंच असतात आणि त्यांचं वजन तब्बल ४ टन (४ हजार किलो) असतं.

या सणाचं मुख्य आकर्षण म्हणजे 'यारिमावाशी' (yarimawashi). यात लोक हा जड रथ वेगाने कोपऱ्यावरून वळवतात. हे वळण घेताना खूप ताळमेळ आणि नियंत्रण लागतं. पण रथाचं प्रचंड वजन आणि वेगामुळे हा प्रकार खूप धोकादायक ठरू शकतो.

या दोन्ही अपघातांमध्ये, मृत्यूमुखी पडलेले पुरुष रथाच्या बाजूला उभे होते आणि ते रथ उलटण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होते.

व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी हळहळले

रथ उलटल्याचे हे व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर लोकांनी तीव्र दुःख आणि चिंता व्यक्त केली आहे. अनेकांनी मृतांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींना लवकर बरं वाटू दे, अशा प्रार्थना केल्या.

एका युजरने लिहिलं की, रथाने खूप वेगाने वळण घेतलं होतं. तर दुसऱ्याने या घटनेला मोठी शोकांतिका म्हटलं आहे. काहींनी तर या सणातील अशा धोकादायक आणि वेगाच्या प्रकारांवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.

'परंपरेपेक्षा सुरक्षितता नेहमीच महत्त्वाची असली पाहिजे,' असं एका युजरने मृतांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती व्यक्त करताना लिहिलं.

या दोन मृत्यूंमुळे जड आणि हलणाऱ्या रथांचा समावेश असलेल्या पारंपरिक सणांमधील धोक्यांकडे पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. पोलीस या दोन्ही अपघातांचा तपास करत आहेत. पण एकाच दिवसात दोन जणांचा बळी गेल्याने सणात सहभागी झालेले लोक आणि व्हिडिओ पाहणारे नेटकरी खूप हळहळत आहेत.