Ivanka Trump : इराणसमर्थित दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या मोहम्मद अल-सादी या संशयिताने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इव्हांका ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक दावा समोर आला आहे.
Ivanka Trump : अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, इराणसमर्थित दहशतवादी गटांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या एका संशयिताने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलगी इव्हांका ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला होता. इराणचे लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा कट आखण्यात आल्याचा दावा अमेरिकन तपास यंत्रणांनी केला आहे.

तुर्कीमध्ये अटक, अमेरिकेकडे प्रत्यार्पण
मिळालेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय मोहम्मद बाकेर साद दाऊद अल-सादी याला तुर्कीमध्ये अटक करण्यात आली आणि त्यानंतर अमेरिकेकडे प्रत्यार्पित करण्यात आले. तपास अधिकाऱ्यांच्या मते, अल-सादी हा इराणसमर्थित नेटवर्कमधील सक्रिय सदस्य असून त्याचे अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवादी कारवायांशी संबंध आहेत. त्याच्या अटकेनंतर अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी तपास अधिक तीव्र केला आहे.
इव्हांका ट्रम्प यांच्या घराचा आराखडा जप्त
तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, अल-सादीने इव्हांका ट्रम्प यांना ठार मारण्याची शपथ घेतली होती. विशेष म्हणजे, फ्लोरिडामध्ये इव्हांका ट्रम्प आणि त्यांचे पती जेरेड कुशनर राहत असलेल्या आलिशान निवासस्थानाचा आराखडाही त्याच्याकडे सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे ट्रम्प कुटुंबाच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
‘तुमचे राजवाडेही वाचवू शकणार नाहीत’; सोशल मीडियावर धमक्या
अल-सादीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर कथितरित्या फ्लोरिडातील परिसराचा फोटो पोस्ट करत अमेरिकन नागरिकांना धमकी दिल्याचा आरोप आहे. त्या पोस्टमध्ये अरबी भाषेत “तुमचे राजवाडेही तुमचे रक्षण करू शकणार नाहीत आणि सिक्रेट सर्व्हिसही नाही” असा इशारा देण्यात आला होता. तपास यंत्रणांच्या मते, तो स्नॅपचॅटसह इतर सोशल मीडिया माध्यमांतूनही संभाव्य लक्ष्यांना धमक्या देत होता.
कासिम सुलेमानीच्या मृत्यूनंतर सूडाची भावना
२०२० मध्ये बगदाद येथे अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात इराणचे वरिष्ठ लष्करी कमांडर कासिम सुलेमानी ठार झाले होते. त्यानंतर अमेरिकेविरोधात सूड उगवण्याची भावना इराणसमर्थक गटांमध्ये वाढल्याचे सांगितले जाते. वॉशिंग्टनमधील इराकी दूतावासाचे माजी उप लष्करी सहचारी एन्तिफाध कानबर यांनी दावा केला की, अल-सादी उघडपणे ट्रम्प कुटुंबाविरोधात सूड घेण्याबाबत बोलत होता.
अनेक आंतरराष्ट्रीय हल्ल्यांमध्ये सहभागाचा आरोप
अमेरिकेच्या न्याय विभागाने अल-सादीवर युरोप आणि अमेरिकेतील तब्बल १८ हल्ल्यांमध्ये सहभागाचा आरोप ठेवला आहे. अॅमस्टरडॅममधील बॉम्बस्फोट, लंडनमधील चाकू हल्ले, टोरोंटोतील अमेरिकी वाणिज्य दूतावासावरील गोळीबार आणि ज्यू समुदायावरील हल्ल्यांशी त्याचा संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, तो कताइब हिजबुल्लाह आणि इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) या संघटनांशी संबंधित होता.
सोशल मीडियावर सक्रिय, दहशतवादी नेटवर्कशी जवळीक
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अल-सादी सोशल मीडियावर सतत सक्रिय होता. त्याच्या पोस्टमध्ये तो पॅरिसमधील आयफेल टॉवर आणि क्वालालंपूरमधील पेट्रोनास ट्विन टॉवर्ससारख्या ठिकाणी दिसत होता. न्यायालयीन कागदपत्रांमध्ये त्याचे कासिम सुलेमानी यांच्यासोबतचे फोटोही समोर आले आहेत. सध्या अल-सादीला ब्रुकलिन येथील मेट्रोपॉलिटन डिटेंशन सेंटरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे.


