Mojtaba Khamenei : इराणचे नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनी हे वडील अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर एकदाही जगासमोर आलेले नाहीत. अमेरिकेच्या हल्ल्यात ते स्वतः गंभीर जखमी झाले असून, सध्या अज्ञातवासातून गुप्त आणि हाताने लिहिलेल्या चिठ्ठ्यांद्वारे देशाचा कारभार पाहत असल्याचं एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनी यांनी अजूनपर्यंत एकदाही सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावलेली नाही किंवा त्यांचा आवाजही कोणी ऐकलेला नाही. अमेरिकेसोबतच्या संघर्ष काळात त्यांचे बहुतेक संदेश हे लिखित स्वरूपात आले आहेत. यामागे एक मोठं कारण असल्याचं बोललं जातंय. रिपोर्ट्सनुसार, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात त्यांचे वडील, अयातुल्ला अली खामेनी, मारले गेले. त्याच हल्ल्यात मोजतबा हे सुद्धा गंभीर जखमी झाले होते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

'द न्यूयॉर्क टाइम्स'ने एका सविस्तर रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, वडिलांच्या हत्येनंतर सत्ता सांभाळणारे मोजतबा खामेनी गंभीर जखमी आहेत आणि सध्या ते अज्ञातवासातूनच काम करत आहेत. त्यांचा जगाशी संपर्कही खूप कमी आहे.

खामेनी यांच्या प्रकृतीची माहिती असलेल्या चार वरिष्ठ इराणी सूत्रांनी या वृत्तपत्राला सांगितलं की, "ते गंभीर जखमी असले तरी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त आणि कामात सक्रिय आहेत." मात्र, त्यांना झालेल्या शारीरिक जखमा खूप गंभीर आहेत. त्यांच्या एका पायावर "तीन वेळा शस्त्रक्रिया" झाली असून आता त्यांना कृत्रिम पाय बसवला जाणार आहे. याशिवाय, त्यांच्या एका हातावरही शस्त्रक्रिया झाली असून तो हळूहळू बरा होत आहे. रिपोर्टनुसार, "त्यांचा चेहरा आणि ओठ गंभीररित्या भाजले आहेत, ज्यामुळे त्यांना बोलण्यात अडचण येत आहे." त्यामुळे भविष्यात त्यांना रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीची गरज भासू शकते.

मोजतबा खामेनी संवाद कसा साधतात?

सुप्रीम लीडर झाल्यापासून खामेनी यांनी कोणताही जाहीर कार्यक्रम किंवा टीव्हीवर भाषण दिलेलं नाही. रिपोर्टनुसार, हा त्यांचा जाणूनबुजून घेतलेला निर्णय आहे, कारण अशा महत्त्वाच्या वेळी "त्यांना स्वतःला कमजोर किंवा असहाय्य दाखवायचं नाहीये."

त्याऐवजी, त्यांचा संवाद साधण्याचा मार्ग पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, "त्यांच्यापर्यंत जाणारे संदेश हाताने लिहून, लिफाफ्यात बंद करून, माणसं आणि मोटरसायकलच्या साखळीद्वारे त्यांच्या गुप्त ठिकाणापर्यंत पोहोचवले जातात." त्यांच्याकडून येणारी उत्तरंही याच पद्धतीने येतात.

अगदी वरिष्ठ अधिकारीही त्यांना भेटणं टाळत आहेत. रिपोर्टमध्ये पुढे असंही म्हटलं आहे की, "वरिष्ठ सरकारी अधिकारी त्यांना भेटायला जात नाहीत, कारण इस्रायल आपला माग काढून खामेनींपर्यंत पोहोचेल आणि त्यांची हत्या करेल, अशी भीती त्यांना वाटते."

त्यांच्या पदाचा विचार करता, IRGC चे वरिष्ठ कमांडर आणि उच्च सरकारी अधिकारी त्यांना भेटत नसले तरी, राष्ट्रपती मसूद पेझेश्कियन, जे स्वतः एक हार्ट सर्जन आहेत, आणि आरोग्य मंत्री त्यांच्या उपचारात सहभागी आहेत.

सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात अनिश्चित काळासाठी युद्धविराम लागू आहे. दोन्ही बाजू पुन्हा एकदा वाटाघाटी सुरू करण्यासाठी आणि होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याच्या मार्गांवर विचार करत असतानाच या घडामोडी समोर आल्या आहेत.