आयपीएलला टायटल स्पॉन्सर करणाऱ्या कंपन्यांना लागलेला 'शाप' कायम असल्याचं दिसतंय. आतापर्यंत ज्या कंपन्यांनी स्पॉन्सरशिप घेतली, त्या अडचणीत आल्या. आता टाटा ग्रुपलाही याचा फटका बसतोय का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई (२० सप्टेंबर): आयपीएल ही जगातली सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आहे. या लीगला स्पॉन्सर करण्यासाठी आणि जाहिराती देण्यासाठी कंपन्यांची अक्षरशः झुंबड उडते. हजारो कोटी रुपये मोजून कंपन्या टायटल स्पॉन्सरशिप मिळवतात आणि त्यातून तगडी प्रसिद्धीही मिळवतात. आयपीएल सुरू झाल्यापासून आतापर्यंत अनेक कंपन्यांनी स्पॉन्सरशिपवर हजारो कोटींची उधळपट्टी केली आहे. टायटल स्पॉन्सर करणारी कंपनी एका-दोन वर्षांतच हजारो कोटी रुपये खर्च करते. पण, या टायटल स्पॉन्सरशिपचा एक 'शाप' आहे, जो कंपन्यांची पाठ सोडत नाहीये. आयपीएलला स्पॉन्सर करणाऱ्या कंपन्या कोणत्या ना कोणत्या मोठ्या समस्येत अडकल्याचा इतिहास आहे. आता या यादीत टाटा ग्रुपचाही नंबर लागल्याची चर्चा आहे.

आयपीएल टायटल स्पॉन्सरची धाकधूक

डीएलएफपासून सुरू झालेला हा प्रवास आता टाटा आयपीएलपर्यंत येऊन पोहोचला आहे. या काळात अनेक कंपन्यांनी आयपीएलची टायटल स्पॉन्सरशिप घेतली. पण यातल्या बहुतांश कंपन्या नंतर मोठ्या संकटात सापडल्या. काही कंपन्यांना आर्थिक फटका बसला, तर काही कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या. गेल्या काही वर्षांपासून टाटा ग्रुप आयपीएलचा टायटल स्पॉन्सर आहे. पण आता टाटाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. टाटाच्या शेअर्सचे भावही घसरले आहेत. याशिवाय कंपनीतले अंतर्गत वादही चव्हाट्यावर आले आहेत. टाटा सन्सचे चेअरमन चंद्रशेखरन यांनी राजीनामा दिला होता, पण भागधारकांच्या दबावानंतर त्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली. तरीही टाटाच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. अंतर्गत कलहामुळे शेअर्सचे मूल्य आणि उत्पन्न वेगाने खाली येत आहे. भारताची शान आणि एक भक्कम कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाटा ग्रुपचा पाया आता कुठेतरी हादरताना दिसतोय.

२०२२ मध्ये टाटा कंपनीने आयपीएलची टायटल स्पॉन्सरशिप मिळवली. त्यानंतर २०२८ पर्यंत त्यांनी हा करार वाढवला. पण सध्या टाटा ग्रुप मोठ्या अडचणींचा सामना करत आहे. टाटा सन्ससह ग्रुपमधल्या अनेक कंपन्यांमध्ये अंतर्गत वाद उफाळून आले आहेत.

आयपीएल टायटल स्पॉन्सर कंपन्यांची अवस्था

२००८ मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून आतापर्यंत डीएलएफ, पेप्सी, विवो, ड्रीम11 आणि टाटा या कंपन्यांनी टायटल स्पॉन्सरशिप केली आहे. विशेष म्हणजे, यापैकी जवळपास सर्वच कंपन्या कोणत्या ना कोणत्या संकटात सापडल्या. अर्थात, या कंपन्यांना आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपमुळे किंवा आयपीएल स्पर्धेमुळे थेट फटका बसलेला नाही. तर, या कंपन्या त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांमुळे अडचणीत आल्या आहेत.

२००८ ते २०१२ या काळात डीएलएफकडे आयपीएलची टायटल स्पॉन्सरशिप होती. त्यानंतर डीएलएफला आर्थिक आणि विक्रीच्या समस्यांचा सामना करावा लागला. मग पेप्सीने स्पॉन्सरशिप घेतली. पण पेप्सीलाही व्यवसायात अपेक्षित यश मिळालं नाही, शिवाय आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचाही त्यांना फटका बसला. २०१६ मध्ये विवोने स्पॉन्सरशिप मिळवली. पण भारत-चीन सीमावादानंतर त्यांना माघार घ्यावी लागली. २०२२ मध्ये टाटाने टायटल स्पॉन्सरशिपचे हक्क विकत घेतले. आणि आता टाटा ग्रुपमध्येही खळबळ उडाली आहे.