Indian Origin Savani Brothers Face 835 Years in US Prison for Massive Fraud Scheme: अमेरिकेत भारतीय वंशाचे भास्कर आणि अरुण सवानी हे दोन भाऊ आरोग्यसेवा, व्हिसा आणि आर्थिक फसवणुकीच्या मोठ्या प्रकरणात दोषी आढळले आहेत. आपल्या 'सवानी ग्रुप' मार्फत मेडिकेड योजना, H-1B व्हिसा आणि टॅक्समध्ये घोटाळा केल्याबद्दल त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
Indian Origin Savani Brothers Face 835 Years in US Prison for Massive Fraud Scheme: अमेरिकेत आरोग्यसेवा, व्हिसा आणि आर्थिक फसवणुकीच्या एका मोठ्या प्रकरणात भारतीय वंशाचे दोन भाऊ दोषी ठरले आहेत. पेनसिल्व्हेनियामध्ये राहणारे भास्कर सवानी आणि अरुण सवानी यांनी अनेक वर्षं मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याच्या आरोपाखाली फेडरल ज्युरीने त्यांना दोषी ठरवलं आहे.
या प्रकरणात भास्कर सवानीला ४२० वर्षं आणि अरुण सवानीला ४१५ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. म्हणजेच, दोघांना मिळून तब्बल ८३५ वर्षांच्या शिक्षेचा सामना करावा लागू शकतो. त्यांची सहकारी, अलेक्झांड्रा ओला राडोमियाक ही सुद्धा या घोटाळ्यात दोषी आढळली असून, तिला ४० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
सोशल मीडिया पोस्टमुळे आले होते चर्चेत
फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) चे माजी संचालक काश पटेल यांच्यासोबतचे फोटो सवानी बंधूंनी सोशल मीडियावर शेअर केले होते. या पोस्ट्समुळे ते खूप चर्चेत आले. पण त्यानंतर झालेल्या तपासात त्यांच्या मोठ्या घोटाळ्यांची मालिकाच उघडकीस आली.
'सवानी ग्रुप'च्या नावाखाली गुन्हेगारीचं जाळं
युनायटेड स्टेट्सच्या ॲटर्नी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ६० वर्षीय भास्कर सवानी आणि ५८ वर्षीय अरुण सवानी यांनी "सवानी ग्रुप" नावाने अनेक कंपन्या आणि डेंटल क्लिनिक्सचं एक जाळं तयार केलं होतं. या जाळ्यामार्फत त्यांनी आरोग्यसेवा घोटाळा, व्हिसा फसवणूक, मनी लाँड्रिंग आणि टॅक्स चोरीसारखे अनेक गुन्हे केले. सवानी बंधू मूळचे डेंटिस्ट (दंतवैद्य) असून, त्यांनी आपल्या व्यवसायाचा वापर करूनच हे गुन्हेगारी साम्राज्य चालवलं होतं, असं अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हटलं आहे.
मेडिकेड योजनेला कोट्यवधींचा गंडा
या प्रकरणातील सर्वात मोठा भाग म्हणजे अमेरिकेच्या 'मेडिकेड' आरोग्य योजनेतील फसवणूक. अमेरिकेतील 'मेडिकेड' ही एक सरकारी आरोग्य योजना आहे, जी कमी उत्पन्न असलेले नागरिक, लहान मुलं, गर्भवती महिला आणि दिव्यांगांना मोफत किंवा कमी दरात आरोग्यसेवा पुरवते.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सवानी ग्रुपच्या डेंटल क्लिनिक्सचे मेडिकेडसोबतचे करार संपल्यानंतरही, त्यांनी बनावट मालकांच्या नावावर बिलिंग सुरूच ठेवलं. या माध्यमातून त्यांनी ३ कोटी डॉलर्सपेक्षा जास्त रकमेचे खोटे मेडिकेड क्लेम केल्याचा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. इतकंच नाही, तर काही वेळेला जे डेंटिस्ट अमेरिकेबाहेर होते, त्यांच्या नावाने उपचार केल्याची कागदपत्रं सादर करण्यात आली. काही प्रक्रिया तर यासाठी पात्र नसलेल्या व्यक्तींकडून करून घेतल्याचंही तपासात उघड झालं आहे.
H-1B व्हिसा कार्यक्रमाचा गैरवापर
सवानी बंधूंवरील दुसरा गंभीर आरोप म्हणजे H-1B व्हिसा कार्यक्रमाचा गैरवापर. या कार्यक्रमाद्वारे परदेशातील तज्ज्ञ लोकांना अमेरिकेत कामासाठी आणण्याची परवानगी मिळते. पण सवानी ग्रुपने या व्यवस्थेचा गैरवापर करून भारत आणि इतर अनेक देशांमधून कामगारांना अमेरिकेत आणलं. कामावर रुजू झाल्यावर या कामगारांना बेकायदेशीर फी भरण्यासाठी आणि आपल्या पगाराचा काही भाग कंपनीला परत देण्यासाठी दबाव टाकला जात होता, असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. आपलं व्हिसा स्टेटस टिकवण्यासाठी हे कामगार कंपनीवर अवलंबून होते आणि याच परिस्थितीचा सवानी ग्रुपने गैरफायदा घेतला.
मनी लाँड्रिंग आणि टॅक्स चोरी
फसवणुकीतून मिळवलेला पैसा सवानी ग्रुप अनेक शेल कंपन्यांच्या (बनावट कंपन्या) बँक खात्यांमधून फिरवत होता. या गुंतागुंतीच्या बँकिंग नेटवर्कद्वारे पैसा अवैध मार्गाने फिरवून वैयक्तिक फायद्यासाठी वापरला गेला, असं सरकारी वकिलांनी सांगितलं आहे. याशिवाय, या भावांनी जवळपास १.६ मिलियन डॉलरच्या वैयक्तिक उत्पन्नावर आणि १.१ मिलियन डॉलरच्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर टॅक्स भरला नाही, असाही आरोप आहे. कॉलेजची फी, घराची देखभाल आणि प्रॉपर्टी टॅक्स यांसारखे वैयक्तिक खर्च त्यांनी व्यवसायाचा खर्च म्हणून दाखवल्याचंही तपासात समोर आलं आहे.
परवानगी नसलेल्या मेडिकल उपकरणांचा वापर
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. "मानवी वापरासाठी नाही" असं लेबल असलेली प्रायोगिक डेंटल इम्प्लांट उपकरणं रुग्णांच्या परवानगीशिवाय वापरण्यात आल्याचा आरोप आहे. या उपकरणांना अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाची (FDA) मंजुरी नव्हती. तरीही ती रुग्णांवर वापरण्यात आली, असं सरकारी वकिलांनी म्हटलं आहे.
इतर आरोपीही दोषी, जुलैमध्ये शिक्षेची घोषणा
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणात निरंजन सवानी, अमेन ढिल्लोन, सुनील फिलिप आणि सुसान मालपार्टिडा यांच्यासह इतर अनेकांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे. भास्कर सवानी आणि अरुण सवानी यांच्यावर संघटित गुन्हेगारी, व्हिसा फसवणूक, आरोग्यसेवा घोटाळा, मनी लाँड्रिंग आणि टॅक्स चोरीसह अनेक आरोप सिद्ध झाले आहेत. त्यांच्या शिक्षेची अंतिम घोषणा ८ आणि ९ जुलै २०२६ रोजी पेनसिल्व्हेनियातील फेडरल कोर्टात केली जाण्याची शक्यता आहे. हे प्रकरण अमेरिकेतील अलिकडच्या वर्षांतील सर्वात मोठ्या आरोग्यसेवा घोटाळ्यांपैकी एक मानलं जात आहे.


