Imran Khan Death Rumors Spark Protests : याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, पण 'इम्रान खान यांचा मृत्यू झाला' अशा पोस्ट्स X आणि इतर सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत.

Imran Khan Death Rumors Spark Protests : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय नेते इम्रान खान यांची तुरुंगात हत्या झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरल्याने देशात मोठे राजकीय आंदोलन पेटले आहे. रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात कैद असलेल्या इम्रान यांना भेटण्याची परवानगी नाकारल्याने आणि त्यांच्या बहिणींसह नातेवाईकांची मागणी फेटाळल्याने या अफवांना आणखी बळ मिळाले आहे. अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, पण 'इम्रान खान यांचा मृत्यू झाला' अशा पोस्ट्स X आणि इतर सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत.

बहिणींचा सवाल

या अफवांना जोर आल्यानंतर हजारो इम्रान समर्थक अदियाला तुरुंगाबाहेर जमले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले. काही ठिकाणी सुरक्षा दलांशी चकमक झाल्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इम्रान खान यांच्या तीन बहिणींनी 'इम्रान खान कुठे आहेत?' असा सवाल केल्यानंतर हा विषय अधिक चर्चेत आला. 'तुरुंगात इम्रान खान यांचा प्रचंड छळ होत आहे, आम्हाला त्यांना भेटूही दिले जात नाही,' असा आरोप करत त्यांच्या बहिणींनी जाहीर निवेदन दिले. यानंतरच 'इम्रान खान यांची तुरुंगात हत्या झाली' ही अफवा सोशल मीडियावर अधिक वेगाने पसरली.

सध्या पाकिस्तान सरकार किंवा लष्करी नेतृत्वाने इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दल किंवा मृत्यूच्या अफवेबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, अफवा पसरत असल्यामुळे इस्लामाबाद, लाहोर आणि कराचीसारख्या विविध शहरांमध्ये मोठी निदर्शने सुरू झाली आहेत. सरकारने वेळीच प्रतिक्रिया न दिल्यास हे आंदोलन देशभरात पसरण्याची दाट शक्यता आहे. 2023 पासून इम्रान खान यांचा तुरुंगवास हा पाकिस्तानातील सर्वात मोठे राजकीय संकट बनले आहे.

Scroll to load tweet…

मे महिन्यातही इम्रान यांच्या हत्येची अफवा

याआधी मे महिन्यातही पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेट संघाचे कर्णधार इम्रान खान यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची अफवा जोरदार पसरली होती. मात्र, ही वृत्त खोटे असल्याचे पाकिस्तान सरकारने नंतर अधिकृतपणे स्पष्ट केले होते. इम्रान खान यांच्या मृत्यूची बातमी खोटी असून लोकांनी चुकीच्या प्रचारापासून दूर राहावे, असे आवाहन पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मे महिन्यात एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा इम्रान यांच्या हत्येची अफवा जोर धरत आहे.