Hindu Mans wife who was set on Fire in Bangladesh : पतीने मारहाण करणाऱ्या दोघांना ओळखले होते, त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर पेट्रोल ओतून आग लावली, असे सीमा दास यांनी सांगितले. 

Hindu Mans wife who was set on Fire in Bangladesh : बांगलादेशात अल्पसंख्याक समाजातील एका तरुणावर जमावाने केलेल्या हल्ल्याबद्दल त्याच्या पत्नीने धक्कादायक खुलासा केला आहे. शरीयतपूर येथील रहिवासी खोकोन चंद्र दास घरी परतत असताना जमावाने त्यांना बेदम मारहाण केली आणि पेट्रोल टाकून जाळले, असे त्यांची पत्नी सीमा दास यांनी सांगितले. पतीने मारहाण करणाऱ्या दोघांना ओळखले होते, त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर पेट्रोल ओतून आग लावली, असे सीमा दास म्हणाल्या. दास यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कोणाशीही वैर नसताना दास यांच्यावर हल्ला का झाला, हे समजत नाही, असे सीमा दास यांनी एनडीटीव्हीला सांगितले - "आमचे कोणाशीही वैर नाही. तरीही माझ्या पतीला का लक्ष्य केले गेले, हे मला समजत नाही. आम्ही हिंदू आहोत. आम्हाला शांततेने जगायचे आहे. मी सरकारकडे मदतीची याचना करते," असे सीमा दास म्हणाल्या. खोकोन दास यांच्या एका डोळ्याची शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यांना लवकरच अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

घरी परतताना झाला हल्ला

राजधानी ढाकापासून १५० किलोमीटर अंतरावर खोकोन दास यांची संस्था आहे. बुधवारी घरी परतत असताना हल्लेखोरांनी त्यांना अडवून हल्ला केला. हल्लेखोरांनी पेट्रोल ओतताच त्यांनी जीव वाचवण्यासाठी जवळच्या तलावात उडी मारली. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. स्थानिक लोकांनी दास यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांना पुढील उपचारांसाठी ढाका येथे हलवण्यात आले.

सीमा दास आणि खोकोन दास यांना तीन मुले आहेत. दास यांना रुग्णालयात पोहोचवणाऱ्यांपैकी एका मुस्लिम तरुणाने सांगितले की, तो कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करत आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या काळात बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांवर भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे बांगलादेश सरकारने एका निवेदनात म्हटले आहे.