"हा भोपळा माझ्या गाडीला धडकेल की गाडीवरून जाईल, असाच विचार मी आधी करत होते. त्याचा आकार इतका मोठा होता की, रस्त्याच्या पलीकडून दुसरी कोणती गाडी येतेय का, हेसुद्धा मला दिसत नव्हतं," असा थरारक अनुभव एका महिलेने सांगितला.

अमेरिकेतील आयोवा राज्यातील ड्युब्युक शहरात एक अजब घटना घडली. रस्त्यावरून एक भलामोठा भोपळा एखाद्या मोठ्या केशरी चेंडूसारखा उड्या मारत जाताना दिसला. हे दृश्य पाहून लोक चांगलेच चक्रावले. 'पंपकिनफेस्ट' (Pumpkinfest) या महोत्सवासाठी हा मोठा फुग्याचा भोपळा लावला होता. पण सोसाट्याच्या वाऱ्यामुळे त्याचे दोर तुटले आणि तो थेट रस्त्यावर आला. सीसीटीव्ही आणि ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झालेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. एखाद्या ॲक्शन सिनेमातील सीनसारखं हे दृश्य असल्याचं लोक म्हणत आहेत.

गाडी चालवत असताना अचानक हा महाकाय भोपळा समोर आल्यावर काय वाटलं, याबद्दल पाम मॅककार्डन या महिलेने स्थानिक वृत्तवाहिनीला माहिती दिली. ती म्हणाली, 'हा कोणताही एआय (AI) व्हिडीओ नाही, तर हे खरंच घडलंय. या व्हिडीओत दिसणारी गाडी माझीच होती. असा प्रसंग आपण रोज थोडीच पाहतो!'

'हा भोपळा माझ्या गाडीला धडकेल की गाडीवरून उडी मारेल, हाच विचार माझ्या डोक्यात आधी आला. तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला होता, पण त्याचा आकार इतका मोठा होता की त्यामागून दुसरी कोणती गाडी येतेय का, हे मला अजिबात दिसत नव्हतं,' असंही तिने स्पष्ट केलं.

Scroll to load tweet…

सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना किंवा कोणालाही दुखापत झाली नाही. कोणत्याही गाडीचं किंवा पार्किंग मीटरचं नुकसान झालं नसल्याचं अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केलं. ड्युब्युकचे पोलीस लेफ्टनंट ल्युक बॉक यांनी माध्यमांना सांगितलं की, 'हे बघायला जरी मजेचं वाटत असलं, तरी अशा घटनांमुळे किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो, याचाही आपण विचार करायला हवा.'

दरम्यान, सोसाट्याचा वारा असताना हॅलोवीनची (Halloween) मोठी सजावट सुरक्षितपणे बांधून ठेवावी, असा इशारा प्रशासनाने नागरिकांना दिला आहे. 'शहरातील हॅलोवीनची सजावट पाहायला आम्हाला खूप आवडतं. पण तुमचे भयानक भुतांचे पुतळे, १२ फुटांचे सांगाडे आणि हे महाकाय फुग्याचे भोपळे वाऱ्यात उडून जाणार नाहीत, याची काळजी घ्या आणि ते व्यवस्थित बांधून ठेवा,' असं आवाहन नगरपालिकेने केलं आहे.