अमेरिकेतील इलिनॉयमध्ये एका १९ वर्षीय तरुणाने हिंदू मंदिरावर गोळीबार करण्याचा कट रचला होता. अलेक्झांड्रोस पापोराकिस असं या आरोपीचं नाव असून, ऐनवेळी बंदूक जॅम झाल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मुंबई : शिकागो परिसरातील भारतीय समुदायावर होणारा एक मोठा दहशतवादी हल्ला एफबीआय (FBI) आणि स्थानिक पोलिसांनी उधळून लावला आहे. पॅलाटाईन आणि माउंट प्रॉस्पेक्ट पोलिसांनी संयुक्त कारवाई करत १९ वर्षांच्या अलेक्झांड्रोस पापोराकिसला बेड्या ठोकल्या. अलेक्झांड्रोस हा 'टॅको बेल'मध्ये काम करतो आणि तो स्वतःला 'व्हाईट सुप्रीमासिस्ट' (श्वेतवर्णीय वर्चस्ववादी) मानतो. त्याने अरोरा येथील एका हिंदू मंदिरावर अंधाधुंद गोळीबार करण्याचा कट रचला होता.
इलिनॉयच्या अरोरा शहरातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरावर तो हल्ला करणार होता. पण सुदैवाने ऐनवेळी त्याची बंदूक जॅम झाली आणि मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करण्याच्या काही तास आधीच त्याला अटक करण्यात आली.
एका 'खास दिवशी' हा हल्ला करण्याचा त्याचा प्लॅन होता, असं सरकारी वकिलांनी सांगितलं. पण बंदूक जॅम झाल्यामुळे त्याचा डाव फसला. त्याने आपल्या एका सहकाऱ्याला फोन करून सांगितलं होतं की, बंदूक जॅम झाल्यामुळे तो तिथून कोणाच्याही नजरेस न पडता 'सुपर फास्ट' (अतिशय वेगाने) पळून गेला.
कोण आहे अलेक्झांड्रोस पापोराकिस?
१९ वर्षांचा अलेक्झांड्रोस इलिनॉयमधील पॅलाटाईन इथं राहतो. कुक काउंटी स्टेट्स ॲटर्नी ऑफिसच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की, अलेक्झांड्रोसच्या मनात भारतीयांबद्दल प्रचंड द्वेष होता. "भारतीय लोकांना मारण्यासाठी मी आणखी वाट पाहू शकत नाही," असं तो टॅको बेलमधील आपल्या सहकाऱ्यांना नेहमी सांगायचा.
तपासादरम्यान पोलिसांना त्याचा ८ पानांचा एक जाहीरनामा (मॅनिफेस्टो) सापडला. "व्हाय आय फॉट: ए.के.ए. (अरोरा शूटर्स मॅनिफेस्टो)" असं या जाहीरनाम्याचं नाव होतं. त्याने हा जाहीरनामा एका सहकाऱ्याला ईमेल केला होता. यात त्याने कृष्णवर्णीय, ज्यू आणि भारतीय लोकांना 'सबह्युमन्स' (कनिष्ठ दर्जाचे) म्हटलं होतं आणि जास्तीत जास्त लोकांना मारण्याचा प्लॅन लिहून ठेवला होता. एवढंच नाही तर, "मी एक समाजकंटक, द्वेषाने भरलेला निओ-नाझी आहे आणि रोज सामूहिक हत्याकांडाची स्वप्ने पाहतो," असंही त्याने यात लिहिलं होतं.
ज्या दिवशी तो हा हल्ला करणार होता, त्याच दिवशी नॉर्थ बाल्डविन कोर्ट येथील त्याच्या घरातून बाहेर पडताना पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिसांना सापडलं शस्त्रास्त्रांचं घबाड
या १९ वर्षीय आरोपीच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना अनेक धक्कादायक गोष्टी सापडल्या:
- कोणताही सिरीयल नंबर नसलेली एआर-स्टाईल रायफल ('घोस्ट गन')
- गोळ्यांनी भरलेली अनेक मॅगझिन्स, अतिरिक्त दारूगोळा आणि टॅक्टिकल गिअर (ज्यामध्ये व्हाईट सुप्रीमासिस्टचे पॅच असलेलं बॉडी आर्मर होतं)
- दक्षिण आशियाई लोकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला गॅस कॅनिस्टर
- नाझी विचारसरणीशी संबंधित अनेक वस्तू
अलेक्झांड्रोसवर दहशतवादी धमकी देणे आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या तो पोलीस कोठडीत असून, ३० ऑक्टोबरला त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल.








