फ्लाईदुबईच्या FZ1073 विमानात को-पायलटने कॅप्टनवर हल्ला केला. यामुळे बोईंग 737 MAX 8 विमान वेगाने खाली आले आणि त्याचा रडर तुटला. गंभीर जखमी कॅप्टनने कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि प्रवाशांनी हल्लेखोराला पकडले.
मुंबई : फ्लाईदुबईचे बोईंग 737 MAX 8 विमान सौदी अरेबियाच्या रनवेवर थांबले, तेव्हा त्याच्या शेपटीचा 'रडर' गायब होता. विमानातले सर्व १७४ प्रवासी सुखरूप होते. एव्हिएशन क्षेत्रात याला चमत्कार का म्हटलं जातंय, हे समजून घेण्यासाठी आपल्याला या लँडिंगपासून सुरुवात करावी लागेल.
रडर म्हणजे विमानाच्या शेपटीला असलेला उभा भाग, जो पायलट पायाच्या पेडलने कंट्रोल करतो. बोटीच्या सुकाणूंसारखं हे काम करतं, ज्यामुळे विमानाचं नाक डावीकडे किंवा उजवीकडे वळतं. लँडिंगच्या वेळी, विशेषतः वाऱ्याचा वेग जास्त असताना, रडर विमानाला रनवेच्या सरळ रेषेत ठेवतो. रडर नसेल तर साधा वाराही विमानाला बाजूला ढकलू शकतो आणि पायलटकडे विमान सावरण्यासाठी फार कमी पर्याय उरतात. एखाद्या अनुभवी 737 पायलटलाही असं लँडिंग करणं अशक्य वाटेल.
पण हे लँडिंग ज्या दोन जणांनी केलं, ते या विमानाचे ड्युटीवरचे पायलट नव्हते. ते प्रवासी म्हणून प्रवास करणारे ऑफ-ड्युटी पायलट होते. रक्ताने माखलेल्या कॉकपिटमध्ये जाऊन त्यांनी या डॅमेज झालेल्या विमानाचा ताबा घेतला. त्यांना तयारीसाठी अजिबात वेळ मिळाला नाही आणि विमान कसं रिस्पॉन्स देईल, याचाही काहीच अंदाज नव्हता.
फ्लाईट FZ1073 ने दुबईहून इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळासाठी उड्डाण केलं होतं. टेक-ऑफनंतर लगेचच, विमानाच्या ट्रान्सपॉन्डरने 7700 हा कोड पाठवला, जो इमर्जन्सीचा आंतरराष्ट्रीय सिग्नल आहे. त्यानंतर हा कोड 7500 वर बदलला गेला, ज्याचा अर्थ हायजॅक किंवा विमानात बेकायदेशीर घुसखोरी असा होतो. हे चार अंकी कोड एअर ट्रॅफिक कंट्रोलरसाठी सायलेंट अलार्म असतात. या घटनेनंतर इस्रायलने आपले फायटर जेट्सही पाठवल्याचं वृत्त आहे.
आतून लॉक असलेल्या कॉकपिटमध्ये, ओमानचा नागरिक असलेल्या को-पायलटने कॅप्टनवर चाकूने हल्ला केला आणि विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. त्याचा हेतू आणि राष्ट्रीयत्व अधिकृतपणे कन्फर्म झालेलं नाही, पण इस्रायलने याला दहशतवादी घटना म्हटलंय. कॅप्टन स्मित मच्छिहार हे भारतीय आहेत. त्यांच्याकडे ९,५०० तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे आणि त्यांनी याआधी मुंबईतून स्पाईसजेटसाठी काम केलंय. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर जखमा झाल्या.
भारतीय वेळेनुसार सकाळी १०:५१ च्या सुमारास, सौदी अरेबियाच्या वायव्य भागात विमान ३४,००० फूट उंचीवर होतं. अचानक ते वेगाने खाली येऊ लागलं. अवघ्या ३७ सेकंदात विमान १४,३०० फुटांनी खाली आलं आणि १६,६०० फुटांपर्यंत पोहोचलं. NDTV च्या फ्लाईट-ट्रॅकिंग डेटाच्या विश्लेषणानुसार, विमानाचा खाली येण्याचा वेग मिनिटाला २३,००० फूट होता. म्हणजे विमान दर सेकंदाला ३८६ फूट खाली येत होतं. साधारणपणे विमान मिनिटाला १,५०० ते ३,००० फूट वेगाने खाली येतं. हा वेग नेहमीच्या वेगापेक्षा आठ पटीने जास्त होता. केबिनमधल्या प्रवाशांसाठी हा अनुभव लिफ्टची केबल तुटल्यासारखाच भयानक होता.
विमानाची उंची जशी कमी झाली, तसा त्याचा वेग वाढला. उतारावरून सायकल चालवताना जसा वेग वाढतो, तसंच काहीसं इथे घडलं. विमानाने मॅक ०.९६ (सुमारे १,१०८ किमी/तास) वेग गाठला. काही रिपोर्ट्सनुसार, विमानाने थोड्या वेळासाठी सुपरसॉनिक वेगही ओलांडला होता.
कोणतंच पॅसेंजर विमान एवढ्या वेगासाठी डिझाईन केलेलं नसतं. या वेगात हवेचा दाब एवढा प्रचंड असतो की विमानाचे तुकडे होऊ शकतात. याच दाबामुळे विमानाचा रडर तुटून पडला. कॉकपिटमधल्या झटापटीत पेडलवर पडलेल्या दाबामुळे हे नुकसान आणखी वाढलं असण्याची शक्यता आहे.
737 विमानाचा कॉकपिट दरवाजा बुलेटप्रूफ असतो. तो बाहेरून सिक्युरिटी कोडने किंवा आतून हातानेच उघडता येतो. प्रचंड रक्तस्राव होत असताना आणि शुद्ध हरपत असतानाही, कॅप्टन मच्छिहार यांनी मागे वळून दरवाजा उघडला. वॉशरूममध्ये असलेल्या एका महिला प्रवाशाला आधीच काहीतरी गडबड असल्याचा संशय आला होता आणि तिने केबिन क्रूला सावध केलं होतं. दरवाजा उघडताच चार प्रवाशांनी आत धाव घेतली आणि हल्लेखोराला पकडून ठेवलं. विमानात असलेल्या एका डेंटिस्टने कॅप्टनचा रक्तस्राव थांबवला आणि लँडिंगपर्यंत त्यांना स्थिर ठेवलं.
एवढ्या वेगाने खाली येणाऱ्या विमानाला पुन्हा वर घेणं हे खूप नाजूक काम असतं. पायलटने विमान झटक्यात वर खेचलं असतं, तर विमानाचे पंख आणि शेपटी तुटली असती. आणि जर हळूवार घेतलं असतं, तर विमान जमिनीवर आदळलं असतं. खाली येण्यापासून ते पुन्हा सावरण्यापर्यंतचा हा थरार सुमारे पाच मिनिटे चालला. विमानाने पुन्हा उंची गाठली, स्थिर झालं आणि इमर्जन्सी लँडिंगसाठी वळलं.
या घटनेची संपूर्ण माहिती फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमध्ये आहे, जे आता सौदी अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, गंभीर जखमी झालेल्या एका भारतीय कॅप्टनने हार मानली नाही. सामान्य प्रवाशांनी असामान्य धैर्य दाखवलं आणि दोन ऑफ-ड्युटी पायलट्सनी एका डॅमेज विमानाला सुखरूप जमिनीवर उतरवलं.
(गिरीश लिंगण्णा हे पुरस्कार विजेते सायन्स कम्युनिकेटर आणि डिफेन्स, एरोस्पेस व जिओपॉलिटिकल ॲनालिस्ट आहेत. ते जर्मनीच्या ADD इंजिनिअरिंग GmbH ची उपकंपनी असलेल्या ADD इंजिनिअरिंग कंपोनंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)


