मध्य पूर्वेतील तणावामुळे एअर इंडिया एक्सप्रेसने रियाध, जेद्दाह आणि दम्मामची उड्डाणे १७ ऑक्टोबरपर्यंत रद्द केली आहेत. प्रवाशांना मोफत तिकीट बदलण्याची किंवा परतावा मिळवण्याची सुविधा दिली आहे.

मुंबई : एअर इंडिया एक्सप्रेसने सौदी अरेबियातील प्रमुख शहरांकडे जाणारी आपली उड्डाणे तात्पुरती थांबवली आहेत. मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे एअरलाइनने हा निर्णय घेतला आहे. दम्माम, जेद्दाह आणि रियाधला जाणारी आणि तिथून येणारी सर्व उड्डाणे १७ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.

एअरलाइनने सांगितलं की, ते या भागातील बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठीच त्यांनी ही उड्डाणे रद्द केली आहेत. सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर गरज पडल्यास फ्लाइट शेड्युलमध्ये आणखी बदल केले जातील, अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्याने दिली.

विमानं रद्द झाल्याने ज्या प्रवाशांना त्रास होत आहे, त्यांना एअर इंडिया एक्सप्रेसने थोडा दिलासा दिला आहे. या प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता त्यांच्या तिकिटाच्या तारखा मोफत बदलता येतील. तिकीट रद्द करायचं असल्यास त्यांना पूर्ण रिफंड मिळेल. प्रवाशांच्या मदतीसाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आमची विशेष टीम तयार आहे, असंही एअरलाइनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

सौदी अरेबियाला जाणाऱ्या किंवा तिथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी आपल्या फ्लाइटचं स्टेटस ऑनलाइन तपासून घ्यावं. त्यासाठी त्यांनी airindiaexpress.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. प्रवाशांनी आपला ईमेल आयडी आणि फोन नंबर एअरलाइनकडे अपडेट करावा, असं आवाहनही प्रवक्त्याने केलं आहे. यामुळे त्यांना वेळेतील बदल आणि इतर तातडीचे अपडेट्स थेट आणि विनाअडथळा मिळू शकतील.