१९६० मध्ये काही शास्त्रज्ञांनी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी लोकसंख्या वाढीमुळे जग नष्ट होईल, अशी भविष्यवाणी केली होती. आता एआय (AI) बद्दलचा त्यांचा एक जुना इशारा खरा ठरत असल्याने हा रिपोर्ट पुन्हा व्हायरल होतोय. पण, तज्ज्ञांनी मात्र लोकसंख्या स्फोटाचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

सध्या सोशल मीडियावर एक जुनी भविष्यवाणी तुफान व्हायरल होत आहे. काही आठवड्यांतच जग नष्ट होईल, असा दावा यात केलाय. शास्त्रज्ञांच्या एका गटाने १३ नोव्हेंबर २०२६ ही तारीख यासाठी निश्चित केली होती. त्यांच्या मते, या दिवशी पृथ्वीवरील लोकसंख्या सर्वोच्च पातळीवर पोहोचेल आणि त्यामुळे एक महाभयंकर परिस्थिती निर्माण होईल.

ही भविष्यवाणी १९६० मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिसर्च पेपरवर आधारित आहे. इलिनॉय युनिव्हर्सिटीचे (University of Illinois) तीन संशोधक - हेंज वॉन फोर्स्टर, पॅट्रिशिया एम. मोरा आणि लॉरेन्स डब्ल्यू. अमियट यांनी 'सायन्स' जर्नलमध्ये हा पेपर पब्लिश केला होता. त्यांनी पाश्चात्य समाजातील ट्रेंड आणि लोकसंख्या वाढीच्या गणितीय मॉडेल्सचा अभ्यास केला. त्यावेळी जगाची लोकसंख्या साधारण ३ अब्ज होती. जर याच वेगाने लोकसंख्या वाढत राहिली, तर १३ नोव्हेंबर २०२६ ला ती अमर्याद (infinity) होईल, म्हणजेच पृथ्वीची क्षमता संपेल, असा हिशोब त्यांनी मांडला होता. आता २०२६ जवळ येत असताना ही जुनी भविष्यवाणी पुन्हा चर्चेत आली आहे.

लोकांमध्ये भीतीचे वातावरण

लोक सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट शेअर करत असून थोडे घाबरलेही आहेत. विशेष म्हणजे, या रिसर्च टीमचे प्रमुख हेंज वॉन फोर्स्टर यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) बद्दलही एक भाकीत केलं होतं, जे आज खरं ठरताना दिसतंय. १९९५ च्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते की, एआय माणसांसारखा विचार करू शकतो, असा समज करून घेणं खूप धोकादायक आहे. काम करणं आणि समजून घेणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत, हे सांगण्यासाठी त्यांनी रोबोटचं उदाहरण दिलं होतं. आज जेव्हा लोक चॅटबॉट्ससोबत भावनिक नाती जोडत आहेत, तेव्हा त्यांच्या या शब्दांची आठवण काढली जात आहे.

वॉन फोर्स्टर यांचं २००२ मध्ये निधन झालं. पण आता त्यांच्या लोकसंख्या आणि एआय या दोन्ही भविष्यवाण्या एकत्र व्हायरल होत आहेत. एआय बद्दल ज्या माणसाचा अंदाज खरा ठरला, तो जगाच्या विनाशाबद्दलही बरोबर असू शकतो, असं लोकांना वाटतंय. पण, वैज्ञानिक जगताने १९६० च्या या मॉडेलवर आधीच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. हे एक हायपरबोलिक ग्रोथ मॉडेल होतं, ज्यामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग सतत वाढत राहील असं गृहीत धरलं होतं. प्रत्यक्षात मात्र तसं काही घडलं नाही.

तज्ज्ञांनी फेटाळला दावा

लोकसंख्येतील बदलांमुळे आता जन्मदर खूप कमी झाला आहे. शिक्षण, आरोग्य सुविधा, शहरीकरण आणि महिलांचा वाढता सहभाग यामुळे जागतिक लोकसंख्या वाढीचा वेग मंदावला आहे. सध्या जगाची लोकसंख्या सुमारे ८.३ अब्ज आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (UN) अंदाजानुसार, या शतकाच्या अखेरीस ती सर्वोच्च पातळीवर पोहोचेल आणि त्यानंतर स्थिर होईल किंवा कमी होईल. त्यामुळे २०२६ मध्ये अचानक एखादं मोठं संकट येण्याची कोणतीही वैज्ञानिक शक्यता नाही. तरीही, या व्हायरल दाव्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता आणि थोडी चिंता नक्कीच निर्माण झाली आहे. काही युजर्स मजेत "नोव्हेंबरपर्यंत मज्जा करून घ्या" असं लिहित आहेत. तर काही जण याला हवामान बदल, साधनसंपत्तीची कमतरता आणि युद्धांसोबत जोडून गंभीरपणे पाहत आहेत.

मूळ रिसर्च पेपर हा फक्त एक गणितीय अंदाज होता, तो काही जगाच्या विनाशाचा इशारा नव्हता. हेंज वॉन फोर्स्टर हे सायबरनेटिक्स क्षेत्रातील एक मोठे शास्त्रज्ञ होते. आज मशीन लर्निंग आणि लार्ज लँग्वेज मॉडेल्स माणसांसारखा संवाद साधत असल्याने, एआय बद्दलचे त्यांचे विचार खूप महत्त्वाचे ठरतात. लोक आज या मॉडेल्सचा वापर मित्र, सल्लागार आणि रोमँटिक पार्टनर म्हणून करत आहेत. बुद्धिमत्तेचा आभास निर्माण करणं किती धोकादायक असू शकतं, याचा अचूक इशारा वॉन फोर्स्टर यांनी आधीच दिला होता.