Donald Trump Slams Pope Leo XIV Over War : युद्ध थांबवण्याचं आवाहन करणाऱ्या पोप लिओ १४ यांच्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार टीका केली आहे. स्वतःला येशूच्या रूपात दाखवणारा एक AI फोटो शेअर करत ट्रम्प यांनी पोपच्या शांततेच्या संदेशावर हल्लाबोल केला आहे.
Donald Trump Slams Pope Leo XIV Over War : युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन करणारे ख्रिश्चन धर्मगुरू पोप लिओ १४ यांच्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चांगलेच भडकले आहेत. ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू असलेल्या पोपवरच त्यांनी कडक शब्दांत टीका केली आहे. इतकंच नाही, तर आपण येशूच्या रूपात असल्याचा एक AI-निर्मित फोटो त्यांनी 'ट्रुथ' या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामधून, शांततेचा संदेश देणाऱ्या पोपसोबत ट्रम्प यांनी थेट पंगा घेतला आहे.
या AI फोटोमध्ये, ट्रम्प येशूंप्रमाणे पांढरा शुभ्र झगा घालून एका आजारी व्यक्तीच्या कपाळावर हात ठेवून त्याला बरं करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. फोटोच्या बॅकग्राउंडला अमेरिकेचा झेंडा, सैनिक, लढाऊ विमानं आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दिसत आहेत. बायबलमध्ये येशूंनी लाजरस नावाच्या व्यक्तीला जीवनदान दिल्याचा उल्लेख आहे, या फोटोतून त्याच प्रसंगाची आठवण करून देण्याचा प्रयत्न दिसतोय.
पोप यांना प्रत्युत्तर देणाऱ्या या फोटोमधून ट्रम्प जणू काही 'तुम्ही धर्मगुरू असाल, तर तुम्ही ज्यांची पूजा करता तो येशू मीच आहे,' असं सांगू पाहत आहेत.
पोप यांच्यावर इतका राग का?
दीड महिना चाललेल्या आणि अजूनही धुमसत असलेल्या मध्य पूर्वेतील युद्धाला पोप यांनी विरोध केला होता. 'शांतता आणि चर्चेतून समस्येवर तोडगा काढा,' असं आवाहन त्यांनी केलं होतं. 'स्वतःला सर्वशक्तिमान समजण्याच्या भ्रमातून हे युद्ध पुढे नेलं जात आहे आणि ते आक्रमक बनलं आहे. देवाला युद्ध आवडत नाही आणि तो बॉम्ब टाकणाऱ्यांच्या बाजूने नसतो. इराणची संस्कृती नष्ट करण्याची धमकी अजिबात स्वीकारार्ह नाही. यावर चर्चा हाच एकमेव उपाय आहे,' अशा शब्दांत त्यांनी सल्ला दिला होता.
यामुळे ट्रम्प संतापले आणि त्यांनी पोपवर टीका करणारी एक मोठी पोस्ट लिहिली. त्यात ते म्हणाले, 'पोप गुन्हेगारीबद्दल मवाळ भूमिका घेतात आणि परराष्ट्र धोरणात ते खूपच कच्चे आहेत. ट्रम्प सरकार घाबरलं आहे, अशा अविर्भावात ते बोलतात. हे मला अजिबात आवडलेलं नाही.'
पुढे त्यांनी लिहिलं, 'इराणकडे अणुबॉम्ब असले तरी चालतील, पण अमेरिकेत ड्रग्स आणि खुनी लोकांना तुरुंगातून सोडून पाठवणाऱ्या व्हेनेझुएलावर हल्ला करणं चुकीचं आहे, अशी भूमिका घेणारे पोप मला नकोत. ज्या कामासाठी लोकांनी मला प्रचंड बहुमताने निवडून दिलं, ते काम केल्यावर माझ्यावर टीका करणारे पोप मला अजिबात नको आहेत,' असं त्यांनी उघडपणे म्हटलं आहे.
एवढ्यावरच न थांबता ते म्हणाले, 'पोप बनणाऱ्यांच्या यादीत लिओ यांचं नावही नव्हतं. पण मी अध्यक्ष असल्यामुळे माझ्यासोबत डील करणं सोपं जाईल, या कारणामुळे अमेरिकन असलेल्या त्यांना पोप बनवण्यात आलं. त्यांनी राजकारण सोडून धार्मिक कामांवर लक्ष केंद्रित करावं आणि एक चांगला पोप बनण्याचा प्रयत्न करावा,' असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
याआधी इस्टरच्या कार्यक्रमात ट्रम्प यांनी 'लोक मला येशू म्हणतात,' असं विधान केलं होतं. यावर पाद्र्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्याआधीही त्यांनी स्वतःचा AI फोटो शेअर केला होता.
पोप यांचं प्रत्युत्तर:
ट्रम्प यांच्या टीकेला उत्तर देताना पोप लिओ यांनी शांतपणे म्हटलं आहे की, 'मी ट्रम्प यांना घाबरत नाही. मी युद्धाविरोधात बोलणं सुरूच ठेवणार आहे.'
धर्मगुरूंसोबत ट्रम्प यांचा वाद
- स्वतःला सर्वशक्तिमान समजून युद्ध सुरू ठेवलं जात आहे. हे देवाला आवडणार नाही. चर्चा हाच उपाय आहे: पोप
- माझ्यावर टीका करणारे पोप मला नकोत. मी अध्यक्ष असल्यामुळे माझ्याशी जुळवून घेणं सोपं जाईल म्हणून त्यांना पोप बनवलं गेलं: ट्रम्प
- मी ट्रम्प यांना घाबरत नाही. युद्धाविरोधात माझा आवाज उठवतच राहणार: पोप लिओ यांचा पलटवार


