Donald Trump Celebrates Diwali : मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी दिवाळीचा सण साजरा केला. यावेळी त्यांनी दिवादेखील लावला. याप्रसंगी भारतीय राजदूत विनय क्वात्रा आणि अमेरिकन-भारतीय समुदायाचे लोकही उपस्थित होते.
Donald Trump Celebrates Diwali : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी समारंभात भाग घेतला आणि यानिमित्ताने भारतातील लोक आणि भारतीय-अमेरिकन लोकांना शुभेच्छा दिल्या. ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले आणि त्यांना एक महान व्यक्ती आणि चांगला मित्र म्हटले. त्यांनी अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार आणि प्रादेशिक शांततेवरही आपले मत मांडले. ट्रम्प म्हणाले की, त्यांनी आज पंतप्रधान मोदींशी चर्चा केली, संभाषण खूप चांगले झाले. त्यांनी व्यापार आणि पाकिस्तानसोबत युद्ध न करण्यावर चर्चा केली. ट्रम्प म्हणाले की, पाकिस्तान आणि भारत यांच्यात कोणतेही युद्ध नाही आणि ही खूप चांगली गोष्ट आहे.
“माझं भारतातील लोकांवर खूप प्रेम"
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “माझं भारतातील लोकांवर खूप प्रेम आहे. आपल्या देशांमध्ये अनेक चांगले करार होत आहेत. मी आज पंतप्रधान मोदींशी बोललो आणि आमचे संबंध खूप चांगले आहेत. त्यांनी रशियाकडून जास्त तेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्याप्रमाणेच पंतप्रधान मोदींनाही रशिया आणि युक्रेनमधील युद्ध लवकर संपावे असे वाटते. त्यांनी तेल खरेदीत मोठी कपात केली आहे आणि भविष्यातही ती कमी करत राहतील.”
समारंभात भारतीय समुदायाचे अनेक लोक उपस्थित
अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी व्हाईट हाऊसमधील दिवाळी समारंभात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि स्वतःच्या वतीने ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. राजदूत विनय क्वात्रा म्हणाले की, दिवाळीच्या निमित्ताने व्हाईट हाऊस, ओव्हल ऑफिस आणि आपल्या घराचे दरवाजे उघडणे हे अमेरिकेतील विविधतेची ताकद दर्शवते. ते पुढे म्हणाले की, दिवाळीचा प्रकाश अमेरिकेचे यश आणि भारत-अमेरिका भागीदारी अधिक दृढ करो. या समारंभात भारतीय समुदायाचे अनेक लोकही उपस्थित होते.


