सार
Donald Trump Attack : इस्कॉन मंदिर कोलकाता उपाध्यक्ष राधारमण दास म्हणाले की, 48 वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी जगन्नाथ रथयात्रा उत्सव वाचवला होता.
Donald Trump Attack : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात ते जखमी झाले असून त्यांच्या कानाला दुखापत झाली आहे. पेनसिल्व्हेनिया येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प हे थोडक्यात बचावले. यानंतर त्यांच्या सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी त्यांना स्टेजवरून बाहेर नेले. दरम्यान आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्ल्यात बचाव करण्यात आला. यावरुन इस्कॉनकडून मोठा दावा करण्यात येत आहे. यावरुन जगभरात चर्चांना मोठे उधाण आले आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर इस्कॉनकडून मोठा दावा करण्यात आला आहे. इस्कॉन मंदिर कोलकाताचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी हा दावा केला आहे. राधारमण दास यांच्या दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राधारमण दास म्हणाले की, "डोनाल्ड ट्रम्प यांचे प्राण भगवान जगन्नाथ यांनी वाचवले आहेत." यासंदर्भात त्यांनी एक ट्वीटही केले आहे.
इस्कॉन मंदिर कोलकाताचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी ट्वीट केले आहे की, "आजपासून ठिक 48 वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी जगन्नाथ रथयात्रा उत्सव वाचवला होता. त्यामुळे जगन्नाथ यांच्या कृपेनंच डोनाल्ड ट्रम्प यांचे प्राण वाचले आहेत. संपूर्ण जग जगन्नाथ रथयात्रा उत्सव साजरा करत असतानाच ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्याचा जगन्नाथाने डोनाल्ड ट्रम्प यांना वाचवून उपकाराची परतफेड केली आहे."
दास पुढे बोलताना म्हणाले की, जुलै 1976 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी रथ बांधण्यासाठी इस्कॉनच्या भाविकांना त्यांचं ट्रेन यार्ड मोफत देऊन रथयात्रा आयोजित करण्यास मदत केली होती. सोमवारी जग 9 दिवसांचा जगन्नाथ रथयात्रा उत्सव साजरा करत आहे. अशातच ट्रम्प यांच्यावर झालेला हा हल्ला आणि त्यांची संकुचित सुटका यातून जगन्नाथाचा हस्तक्षेप दिसून येतो. पेनसिल्व्हेनियामध्ये एका निवडणूक रॅलीत ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला होता. या घटनेत गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष राधारमण दास यांनी ट्रम्प यांच्या संकुचित सुटकेला दैवी हस्तक्षेप असल्याचे वर्णन केले आहे.
'त्या' वेळी खूपचं आव्हानं होती, ट्रम्प यांनी केलेली मदत
इस्कॉन कोलकाता मंदिराच्या अधिकृत ट्विटर हेडलीवरून राधारमण दास यांची ट्विटरवरची पोस्ट पुन्हा रिपोस्ट करण्यात आली आहे. दास म्हणाले की, विश्वाचे स्वामी महाप्रभू जगन्नाथ यांची पहिली रथयात्रा 1976 मध्ये अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीने सुरू झाली. सुमारे 48 वर्षांपूर्वी जेव्हा इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (इस्कॉन) न्यूयॉर्कमध्ये रथयात्रा काढणार होती, तेव्हा अनेक आव्हानं होती, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी फिफ्थ ॲव्हेन्यू वापरण्याची परवानगी दिली, ही खरोखरच मोठी गोष्ट आहे.
दैवी कृपेमुळेच वाचले डोनाल्ड ट्रम्प यांचे प्राण
दैवी कृपेमुळे ट्रम्प यांचे प्राण वाचले, असं इस्कॉनने म्हटलं आहे. कारण बरोबर 48 वर्षांपूर्वी ट्रम्प यांनी जगन्नाथ रथयात्रेची आशा वाढवली होती. दास यांनी असंही सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी 1976 मध्ये रथ बांधण्यासाठी त्यांचे ट्रेन यार्ड मोफत दिले होते. त्यांच्या या निर्णयामुळे भाविकांना रथयात्रा आयोजित करण्यात मदत करण्यात आली आहे.
आणखी वाचा :
Donald Trump Attack News : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर का झाडली गोळी?, कारण आलं समोर