Dhaka Airport Fire: ढाका विमानतळावर भीषण आग! बांगलादेशातील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो विभागात शनिवारी अचानक आग भडकली. मोठं नुकसान, जीवितहानी नाही, आग विझवण्यासाठी बचावकार्य सुरू.
ढाका: बांगलादेशातील ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो भागात शनिवारी भीषण आग लागली. विमान बांगलादेश एअरलाइन्सचे प्रवक्ते कौसर मेहमूद यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना दुपारी २:१५ च्या सुमारास घडली. माहिती मिळताच विमानतळ अग्निशमन विभाग, बांगलादेश हवाई दलाचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्यासाठी संयुक्त प्रयत्न सुरू केले.
विमानतळावरील उड्डाणे तात्पुरती स्थगित
अधिकाऱ्यांनी विमानतळावरील उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत. बांगलादेशच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाचे (CAAB) जनसंपर्क अधिकारी कौसर मेहमूद यांनी या माहितीला दुजोरा दिला.
ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, अग्निशमन सेवा मुख्यालयाचे अधिकारी तल्हा बिन जासिम यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांना दुपारी २:३० च्या सुमारास आगीची माहिती मिळाली. एकूण २५ अग्निशमन दलाचे युनिट घटनास्थळी कार्यरत आहेत.


