Bangladesh Violence: बांगलादेशात होणाऱ्या निवडणुका पारदर्शक असाव्यात. सर्वसमावेशक निवडणुका व्हायला हव्यात, असे सांगून भारताने शेख हसीना आणि त्यांच्या पक्षाचा विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

Bangladesh Violence दिल्ली: मागील वर्षी शेख हसीना यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी सुरू झालेल्या आंदोलनाला काही वेगळीच दिशा मिळाली आणि सुरू झालेल्या हिंसाचारात तिथल्या अल्पसंख्याक समाजाला मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात आले, त्यांच्यावर सातत्याने हल्ले सुरूच आहेत. भारताने वारंवार या घटनांचा निषेध नोंदवत दोषींवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. मधल्या काळात बांगलादेशात काही प्रमाणात शांतता निर्माण झाल्यासारखे वाटत असतानात तिथे नव्याने हिंसाचाराला सुरूवात झाली आहे. 

बांगलादेशात अल्पसंख्याक गटांवर होणाऱ्या हल्ल्यांवर भारताने तीव्र चिंता व्यक्त करत इशारा दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की बांगलादेशात अल्पसंख्याकांवर सुरू असलेला हिंसाचार चिंताजनक आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी अलीकडेच झालेल्या हिंदू तरुणांच्या हत्येला अत्यंत खेदजनक म्हटले आहे. तसेच, बांगलादेशात भारताविरुद्ध खोटा प्रचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. भारत अशा घटनांकडे दुर्लक्ष करू शकत नाही आणि कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. रणधीर जैस्वाल यांनी पुढे सांगितले की, बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबद्दल मोठी चिंता आहे आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर कायद्यासमोर आणले पाहिजे.

बांगलादेशातील मेमनसिंहमध्ये जमावाने एका हिंदू तरुणाला मारहाण करून ठार मारल्याबद्दल भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 27 वर्षीय दिपू चंद्र दास यांच्या हत्येचा संदर्भ देत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी या मॉब लिंचिंगचा निषेध केला आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कायद्यासमोर आणण्याची मागणी केली. आकडेवारीनुसार, बांगलादेशातील अंतरिम सरकारच्या काळात अल्पसंख्याकांवर सुमारे तीन हजार हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. भारताला बांगलादेशसोबत शांततापूर्ण आणि स्थिर संबंध हवे आहेत. फेब्रुवारीमध्ये बांगलादेशात होणाऱ्या निवडणुका पारदर्शक असाव्यात. सर्वसमावेशक निवडणुका व्हायला हव्यात, असे सांगून भारताने शेख हसीना आणि त्यांच्या पक्षाचा विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

भारत याकडे गांभीर्याने पाहत आहे

बांगलादेशात सत्तापालटानंतर अल्पसंख्याकांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांकडे भारत अत्यंत गांभीर्याने पाहत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आणण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. अल्पसंख्याकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी बांगलादेशच्या अंतरिम सरकारने तातडीने पावले उचलावीत आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी भारताने केली आहे.

हसीना यांची तीव्र टीका

दरम्यान, माजी पंतप्रधान खालेदा झिया यांचा मुलगा तारिक रहमान बांगलादेशात परतल्याबद्दलही रणधीर जैस्वाल यांनी भूमिका स्पष्ट केली. तारिक रहमान यांचे पुनरागमन बांगलादेशातील निवडणुकीच्या संदर्भात पाहिले जात असल्याचे रणधीर जैस्वाल म्हणाले. तब्बल 17 वर्षे लंडनमध्ये निर्वासित म्हणून राहिल्यानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले आहेत. भारताला बांगलादेशसोबतचे संबंध अधिक दृढ करायचे आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. बांगलादेशात स्वतंत्र, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक निवडणुका व्हाव्यात, अशी भारताची इच्छा असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.

बांगलादेशच्या अंतरिम सरकारवर माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पुन्हा एकदा तीव्र टीका केली आहे. देशात मुस्लिमेतरांना राहणे कठीण झाले आहे, हा बांगलादेशचा भूतकाळ नव्हता आणि हे जास्त काळ चालू शकत नाही, असे म्हणत शेख हसीना यांनी निषेध व्यक्त केला. दरम्यान, काल मारला गेलेला तरुण हत्येच्या गुन्ह्यासह अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मृत अमृत मंडल याच्याविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अमृत मंडलसोबत पकडलेल्या तरुणाकडून शस्त्रे जप्त करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली.